क्वालालंपूर - मलेशियाचेपंतप्रधान डा. महातिर मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार देशास नुकसानदायक काम केल्याचं सिद्ध झाल्यास टीव्हीवर भाषण देणाऱ्या डॉ. झाकीर नाईक याचं नागरिकत्व रद्द केलं जाऊ शकतं. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मलेशिया प्रशासनाने भारतीय इस्लामिक धर्म प्रचारक झाकीर नाईकने त्याच्या देशाबाबत भडकाऊ वक्तव्य केल्याबाबत समन्स पाठविले आहेत.
भारत देशातून फरार झालेल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा अध्यक्ष आणि इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकचे वास्तव्य मलेशियात असावे, असा भारतीय तपास यंत्रणेला संशय आहे. अनेकवेळा समन्स बजावूनही नाईक चौकशीसाठी हजर राहिला नसल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करावे, यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. दोन समाजांमध्ये अशांतता निर्माण करणे, बेकायदेशीर कृत्य करणे, असे गुन्हे नाईकवर नोंदविले आहेत. त्याशिवाय ढाकामध्ये जुलै, २०१६ मध्ये एका बेकरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणात त्याचा हात असल्याचा संसय तपास यंत्रणेला आहे.बेकरीवर हल्ला केलेल्या दोघांनी आपण झाकीर नाईकच्या भाषणाने प्रभावित होऊन हा हल्ला केल्याचे तपास यंत्रणेला सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी नाईकचा ताबा भारताला देण्यास नकार दिला होता. २०१५ साली ऑस्ट्रेलियाने सिरुल अझहर उमर याच ताबा मलेशियाला देण्यास नकार दिला होता. त्याच कारणांच्या आधारे आम्हीही नाईकचा ताबा भारताला देण्यास नकार देऊ शकतो, असे मोहम्मद यांनी म्हटले होते. भारतामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही, असे नाईक याचे म्हणणे असल्याचेही मोहम्मद यांनी सांगितले होते.