विप्रो हत्या व बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशी तुर्तास टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 10:04 PM2019-06-21T22:04:00+5:302019-06-21T22:05:38+5:30
आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई - पुण्याच्या विप्रो कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरविलेल्या दोघांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी २४ जून रोजी करायची की नाही, याचा निर्णय उच्च न्यायालय शुक्रवारी घेण्याची शक्यता होती. मात्र, विप्रो बलात्कार आणि खूनप्रकरणी पुणे कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली असून आरोपींची फाशी तुर्तास टळली आहे. त्यामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुरुषोत्तम बोराटे, प्रदीप कोकडे यांनी फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर शिक्षेवर अंमलबजावणी करण्यास कारागृह प्रशासनाने चार वर्षांचा विलंब केला. शिक्षेचे वॉरंट कधीही येऊ शकते, असा विचार करत चार वर्षे सतत मृत्यूच्या छायेत जगलो, असे याचिकेत नमूद आहे.
विलंब आपल्याकडून झाला नाही, असे सरकारतर्फे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले. तर, याचिका फेटाळतानाच्या टिप्पणीची कागदपत्रे सरकारी वकिलांनी ऐनवेळी दिल्याचे सांगत याचिकाकर्त्यांचे वकील युग चौधरी यांनी कागदपत्रांचा अभ्यासासाठी शिक्षेच्या अंमलबजावणीस स्थगिती द्यावी, अशी विनंती केली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला होता.