लोकमत न्यूज नेटवर्क बीड : पतीच्या संमतीने एक विवाहित महिला लग्नाळू तरुणांशी संसार थाटते. हे वाचून आश्चर्य वाटेल, पण खोट्या लग्नाची हीच खरी गोष्ट आहे. पूजा कचरू निलपत्रेवार (२७, रा. तालाबकट्टा, मानवत, जि. परभणी) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. कधी नवरी, कधी करवली तर कधी नवरीची बहीण बनून तिने सुशिक्षितांनाही गंडविल्याची माहिती आहे.
अडीच लाख रुपये देऊन वसमत (जि. परभणी) येथे मुद्रांकावर लग्न लावून आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणातील नवरी अल्पवयीन निघाली असून, ती सध्या अंबाजोगाईच्या सुधारगृहात आहे. करवली बनून आलेली मीना बळीराम बागल (२७) ही न्यायालयीन कोठडीत आहे.
या प्रकरणात १२ डिसेंबरला पोलिसांनी मुक्तीराम गोपीनाथ भालेराव (३१, रा. रिधोरा, जि. परभणी), प्रभाकर शिवाजी दशरथे उर्फ आकाश बालाजी माने (३५, रा. जोड परळी, जि. परभणी), विनोद किसन खिलारे (४४, रा. शिवणी बु., जि. हिंगोली), जयशीला प्रभाकर कीर्तने (३५, रा. अस्वला, जि. हिंगोली), पूजा कचरू निलपत्रेवार (२७) या पाच जणांना अटक केली. या सर्वांना १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावलेली आहे. मास्टरमाईंड पूजा निलपत्रेवार हिने कोठडीत गोंधळ घातला, शिवाय ती गर्भवती आहे. त्यामुळे पुन्हा पोलिस कोठडी घेण्याच्या अटीवर न्यायालयाने १५ डिसेंबरला तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पूजावर चार गुन्हे नोंद पूजा व तिच्या सहकाऱ्यांनी औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली, धुळे, जळगाव, नाशिक व परराज्यातही बनावट लग्न लावून फसविल्याची माहिती समोर आली आहे. पूजावर परभणीतील नानलपेठ, दैठणा, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या पोलिस ठाण्यांत बनावट लग्नाचे गुन्हे नोंद आहेत. पैठणच्या गुन्ह्यात तिचा पती कचरुलाल तुळशीराम निलपत्रेवार हा देखील आरोपी आहे.