डोंबिवली: रिक्षात विसरलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा तासाभरात मानपाडा पोलिसांनी शोध घेत ते महिलेला सुपूर्द केले. रिक्षाचा नंबर नसताना सीसीटिव्हीच्या आधारे तासाभरात दागिने मिळवून देणा-या पोलिसांचे संबंधित महिलेने आभार मानले.
पुर्वेकडील दावडी परिसरात राहणा-या शोभा गायकवाड यांच्या मुलीच्या मैत्रीणीचे बुधवारी दादर येथे लग्न होते. गायकवाड कुटुंबीय लग्नाासाठी दादरला गेले होते. लग्न समारंभ आटोपून रात्री 9 च्या सुमारास ते सर्व डोंबिवलीला आले. रेल्वे स्थानकाबाहेर त्यांनी रिक्षा पकडली होती. दावडी येथे त्यांना सोडून रिक्षाचालक तेथून निघून गेला होता. दरम्यान घरात पाऊल टाकताच शोभा यांना सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षातच राहील्याचे लक्षात आले. त्यांना रिक्षाचा नंबर देखील माहीत नव्हता. त्यांनी तत्काळ मानपाडा पोलिस ठाणे गाठत याबाबत माहीती दिली.
पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे यांचे पथक तपासकामी रवाना के ले. रिक्षाचा नंबर माहीत नसल्याने पोलिसांकडून ज्याठिकाणी गायकवाड कुटुंब रिक्षातून उतरले त्याठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. यात संबंधित रिक्षा आढळुन आली. रिक्षाच्या हूडवर पांढ-या रंगाची पट्टी होती. त्या आधारे रिक्षाचा शोध घेण्यात वनवे यांच्या पथकाला यश आले. रिक्षाचालकाला विचारणा केली असता त्याने दागिन्यांबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचे सांगितले. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने दागिने परत केले. पोलिसांकडून दागिने गायकवाड यांच्या हवाली करण्यात आले.