औरंगाबाद - बचतगटामार्फत स्वस्तात सोने व इतर वस्तू देण्याचे आमिष दाखवून पुंडलिकनगर परिसरातील ५० हून अधिक महिलांना सुमारे दीड कोटी रुपयांचा गंडा घालून महिला पसार झाली आहे. फसवणूक झालेल्या महिला, नागरिकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याविषयी तक्रार केली आहे.सुरेखा मनाजी म्हेत्रे (रा.पुंडलिकनगर गल्ली नं. ११, मूळ रा.दुध डेअरी जवळ, शिवाजीनगर, निलंगा जि.लातूर) असे सदरील महिलेचे नाव आहे. परभणीत राहणारे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि सुरेखा म्हेत्रे यांनी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती फसवणुक झालेल्या नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रारीद्वारे दिली आहे. नागरिकांनी तक्रारीत म्हटले आहे, महिलांना पिठाणी गिरणी, शिलाई मशीन, घरगुती वस्तू मूळ किंमतीपेक्षा कमी दराने देऊन सुरेखा म्हेत्रे हिने सर्वांशी विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यानंतर बचतगटामार्फत दुचाकी योजना आणली. १० महिलांच्या नावावर रक्कम ठेवा, गावंडे हे आपल्याला सबसिडी देतात, त्यानंतर शोरुमला रक्कम जमा झाली की दुचाकी मिळते. त्यावरून अनेकांनी तिच्याकडे रक्कम गुंतविली. तशीच चारचाकी वाहनांची योजना त्या महिलेने आणली. अनेक गाड्या स्वत: गावंडे यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आल्या. सर्व योजना माज्या सहीने मंजुर होतात, योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हेत्रे यांच्याकडे रोख रक्कम द्या, तुमचा फायदा होईल. असे गावंडे यांना लाभार्थ्यांना वारंवार सांगायचे.सेवानिवृत्त झाल्यानंतर गावंडे हे सुरेखा म्हेत्रे यांच्याकड पुंडलिकनगर येथील घरी वास्तव्यास यायचे. अमीषाला बळी पडलेल्या नागरिकांना गावंडे यांनी नेहमी काहीही फसवुणक होणार नाही, तुमचा फायदाच होईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांनी सुरेखा म्हेत्रेकडे चेकद्वारे, आरटीजीएस आणि रोख रक्कम दिली. या सगळ्या प्रकरणात फसवणुक झाल्याचे लक्षात येताच, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी गावंडे यांना नागरिकांनी संपर्क केला असता ते त्या महिलेला घेऊन १९ ऑगस्ट रोजी करमाड परिसरातील एका हॉटेलवर आले. आठ दिवसांत सर्वांची रक्कम देण्याचे आश्वासन गावंडे यांनी दिले. यानंतर ते दोघे एका कारमधून दोघेही निघून गेले. १९ ते २८ ऑगस्टपर्यंत सुरेखा म्हेत्रे हिने नागरिकांना झालेल्यांना रक्कम बँक खात्यावर टाकण्याचे आश्वासन देत झुलवत ठेवले. पोलीसांत तक्रार करू नका, गावंडे यांना याप्रकरणात घेऊ नका, नाहीतर पैसे बुडाले म्हणून समजा, अशी धमकी तिने नागरिकांना दिली.सुरेखा म्हेत्रेचे सर्व मोबाईल क्रमांक व तिचे रक्कम गोळा करण्याचे तंत्र तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारकर्त्यांपैकी काहींचे ३० लाख, कुणाचे १० लाख तर कुणाचे २१ लाख अशी रक्कम त्या महिलेने अॅक्सीस व इंडसइंड बँकेच्या खात्यावर जमा केली. अनेकांनी आरटीजीएस, धनादेशाद्वारे रक्कम दिली आहे. त्या महिलेने रक्कम परत करण्यासाठी दिलेले धनादेश बाऊन्स झाले आहेत. १५ ऑगस्टपासून सदरील महिला परिसरातून फरार झाली असून तिचा शोध लागत नसल्यामुळे फसवणुक झालेल्या सर्व नागरिकांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे तक्रार केली. यावेळी नागरिकांसोबत माजी खा.चंद्रकांत खैरे, पुर्व विधानसभा संघटक राजू वैद्य आदींची उपस्थिती होती. याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आलेले सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दावा केली की, त्या महिलेशी माझा काहीही सबंध नाही. सदरील महिला फक्त ओळखीची होती. त्यामुळे तिने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी हजेरी लावली आहे. माझा व त्या महिलेचा काहीही संबंध नाही.
अनेकांची फसवणुकीची शक्यतानेमका हा काय प्रकार आहे, बाजारभावापेक्षा कमी किंमतीत वस्तू देण्यासाठी कोणत्या योजनेचा वापर सुरेखा म्हेत्रेने केला. या जोडगोळीसोबत आणखी कोण आहे. आणखी किती नागरिकांची अशी फसवणूक झाली आहे. यासाठी पोलीसांनी सदर महिलेला ताब्यात घेण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे.