अकोला : मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर येथून कारने परत येणाऱ्या अकाेल्यातील दाम्पत्याला राेखून त्यांच्यावर पिस्तूल राेखून साेनसाखळी पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाेरट्यांना अकाेल्यातील महिलेने चांगलाच धडा शिकवला़ या महिलेने गुंडाकडील पिस्तूल माेठ्या हिमतीने हिसकावून ते पिस्तूल त्यांच्यावरच राेखले, त्यामुळे गुंड पळायला लागले; मात्र त्यांच्या कारचालकाने पाठलाग करून या गुंडांना अडविले़ त्यानंतर पाेलिसांनी तातडीने धाव घेतल्याने या गुंडांना अटक करण्यात आली आहे़
अकोला येथील रहिवासी नितीन जोशी हे कुटुंबीयांसोबत ओंकारेश्वर येथून देवदर्शन घेऊन अकाेल्याकडे एमएच-३० झेड-०७६३ या क्रमांकाच्या कारने परत येत होते. शिवकोठी या गावाजवळ कारच्या मागून आलेल्या दुचाकीवरील युवकांनी चाक पंक्चर झाल्याचे जाेशी यांना सांगितले. तेव्हा जाेशी यांचे साथीदार शामबिहारी शर्मा यांनी कार थांबविली. नेमकी ही संधी साधून दुचाकीवरील तिघेजण कारजवळ आले आणि पिस्तूल, चाकू व पेचकसचा धाक दाखवून शामबिहारी शर्मा यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. एकाने नितीन जोशी यांच्या पत्नी चंचल जोशी यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चंचल जोशी यांनी गुंडाच्या हातातील पिस्तूलवर झडप टाकून ती पिस्तूल हिसकावली. या प्रकाराने घाबरून जाऊन गुंडांनी आलेल्या दुचाकीने पळ काढला. तेवढ्याच शामबिहारी शर्मा यांनी त्यांच्या कारने चाेरट्यांचा पाठलाग करीत गणेशनगरजवळ दुचाकीला कारने धडक दिली. या धडकेमुळे गुंड जमिनीवर काेसळले़ त्यानंतर पाेलिसांनीही धाव घेऊन आराेपींना ताब्यात घेतले.