मुंबई - बेदरकारपणे कार चालवणाऱ्या महिलेने सोसायटीच्या इमारतीखाली खेळणाऱ्या लहान मुलाच्या अंगावरून कार नेली. त्या लहानग्याचे दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. मात्र, हृदयाचे ठोके चुकविणारा याप्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल साईट्सवर वाऱ्यासारखे वायरल झाले आणि या प्रकरणाला वाचा फुटली. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात कार चालक महिला श्रद्धा चंद्राकारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, काल तिला अटक करून जामीनावर तिची सुटका झाली असल्याची माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक झेविअर रेगो यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
दिंडोशीतील सद्गुरू सोसायटीत २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. इमारतीच्या सीसीटीव्हीत तो कैद झाला. बचावलेला चिमुरडा आणि आरोपी श्रद्धा चंद्राकर एकाच इमारतीत राहतात. त्या लहान मुलाच्या बुटांची लेस बांधण्यासाठी खाली बसला असता श्रध्दाने कार सुरू केली आणि मुलाच्या अंगावरून कार नेली. या प्रकरणानंतर मुलाच्या पालकांनी श्रद्धाचा वाहन परवाना रद्द करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. मात्र, दिंडोशी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे पालकांनी तिच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर श्रद्धाच्या विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कलम २७९ आणि ३३७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे रेगो यांनी पुढे सांगितलं. तसेच वाहतूक पोलिसांकडे वाहन चालक परवाना रद्द करण्याचे अधिकार असल्याची माहिती त्यांनी दिली.