नालासोपारा : ओमान येथे घरकामासाठी गेलेल्या वसईच्या ३० वर्षीय महिलेचा पासपोर्ट घेऊन तिला डांबून ठेवले होते. याबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाल्यावर आयुक्तालयाच्या विशेष शाखेच्या पोलिसांनी पाठपुरावा करत त्या महिलेची पाच दिवसांत सुखरूप सुटका करून भारतात आणण्यात यश मिळवले.
वसई कोळीवाड्याच्या साईदत्तनगरमध्ये राहणाऱ्या कमलावती पारस वर्मा (५०) यांची मुलगी अंजू वर्मा (३०) ही २५ ऑगस्टला मस्कत, ओमान या देशामध्ये नोकरीकरिता गेली होती. परंतु, सध्या तिला तेथे नोकरी करताना त्रास होत असल्याने तिला तेथे नोकरी करायची नव्हती. तसेच तिला भारतात परतायचे होते. परंतु, तिचा पासपोर्ट ओमानमधील एजंट प्रसन्ना याच्याकडे जमा होता. तो पासपोर्ट परत देण्यास नकार देत होता. ती तीन दिवसांपासून मस्कत, ओमान विमानतळावर थांबली असल्याचे आईने वसई पोलिस ठाण्यात ४ जानेवारीला तक्रार अर्जाद्वारे कळविले.
एजंटचा पासपोर्ट, व्हिसाला नकार
हा अर्ज वसई पोलिस ठाणे यांच्याकडून विशेष शाखा, पारपत्र विभाग यांना मिळताच पारपत्र विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ओमान, मस्कत येथे अडकलेल्या अंजू यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा एजंट प्रसन्ना याने अंजूचा पासपोर्ट दोन वर्षांकरिता वाढविला असून, त्यासाठी त्याचे पैसे खर्च झाल्याने तो तिला पासपोर्ट व व्हिसा देत नसल्याचे पोलिसांना कळले.
भारतीय दूतावासाला विनंती
- पोलिसांनी मस्कतमधील भारतीय दूतावासाला इ-मेल करून अंजूला मदत करण्याची विनंती केली. त्यांनी तिला आश्रय देत तेथील भारतीय दूतावासात पोहोचण्यास सांगितले.
- भारतीय दूतावासाने तिच्या व्हिसा स्पॉन्सरशी संपर्क करून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून तेथील कायद्याप्रमाणे लेबर कोर्टात व्हिसा रद्द केल्याने अंजू ही ९ जानेवारीला सुखरूप भारतात परतली.
- ही कामगिरी मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड, विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक कुमारगौरव धादवड, महिला सहायक पोलिस निरीक्षक संजीवनी सोलनकर, पोलिस हवालदार मंजूषा गुप्ता व सीमा दाते यांनी पार पाडली.
कंत्राट रद्द शिवाय जाऊ शकत नाही
ओमान देशात असा नियम आहे की, जर कंत्राटावर कामासाठी गेल्यावर जोपर्यंत कामगार कंत्राट रद्द करत नाही, तोपर्यंत तो परत जाऊ शकत नाही. पाठपुरावा केला व त्या महिलेला भारतात सुखरूप आणले, अशी माहिती पोलिस निरीक्षक कुमार धादवड यांनी दिली.