नवी मुंबई : गांजाविक्रीसाठी मुंब्रा येथून आलेल्या महिलेला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. तिच्याकडून चार किलो १५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. शिळफाटा मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.शहनाज बानो रमजान शेख (३६) असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ती मुंब्रा येथील राहणारी असून, तुर्भे एमआयडीसी परिसरात शिळफाटा मार्गावर गांजाविक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नीलेश माने, विनया पारासुर, हवालदार सलीम इनामदार, इकबाल शेख, कासम पिरजादे आदीच्या पथकाने बुधवारी रात्री शिळफाटा मार्गावरील पेट्रोलपंप पसिरात सापळा रचला होता. या वेळी शहनाज शेख ही महिला संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आली. चौकशीदरम्यान तिच्याकडे चार किलो १५० ग्रॅम गांजा आढळून आला. यानुसार तिच्याविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती मुंब्रा परिसरातून नवी मुंबईत गांजाचा पुरवठा करत असे. यानुसार तिच्या संपर्कात असलेल्या छोट्या-मोठ्या गांजाविक्रेत्यांचा शोध घेत आहेत.
चार किलो गांजासह महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 2:58 AM