ठाणे - उपनगरी रेल्वे प्रवासात महिलांचे दागिने चोरणाऱ्या भक्ती परब (३१, रा. दिवा, ठाणे) या महिलेस ठाणे लोहमार्ग गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी सोमवारी दिली. तिच्याकडून तीन लाख ४३ हजारांचे दागिनेही हस्तगत केले आहेत.
दिवा पूर्व भागातील मीनल चव्हाण (४५) या ७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० ते ९.५३ वाजण्याच्या सुमारास दिवा ते ठाणे असा सीएसएमटी उपनगरी रेल्वेनेमहिलांच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यात उभे राहून प्रवास करीत होत्या. त्याचवेळी अज्ञात महिलेने त्यांच्या खांद्यावरील पर्सची चैन खोलून साडे तीन हजारांचे दागिने लांबविले होते. यामध्ये दोन लाख ९२ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि तीन हजार ९०० ची रोख शा ऐवजाचा समावेश होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याची बारकाईने पोलिसांनी पाहणी केली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, पोलीस हवालदार संदिप गायकवाड,अतूल साळवी, अतूल धायडे आणि अमित बडेकर आदींच्या पथकाने दिवा रेल्वे स्थानकात आलेल्या अप लोकल (मुंबईकडे जाणारी) रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यात या प्रवासी महिलेच्या पाठोपाठ एक संशयीत महिला चढतांना दिसली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आलेल्या महिलेची रेल्वे गुन्हे अभिलेखावरील महिला आरोपींची पडताळणी केली. तेंव्हा ती महिला भक्ती परब असल्याची बाब समोर आली. तिने प्रवास केलेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तसेच खास गुप्त बातमीदाराकडून आरोपी भक्तीची चौकशी करण्यात आली. तिनेच ही चोरी केल्याचे उघडवझाल्याने तिला १७ डिसेंम्बर रोजी अटक केली. तिच्याकडुन चोरीतील सर्व दागिनेही हस्तगत करण्यात आले. रेल्वे प्रवासांमध्ये मौल्यवान चीज वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहनही लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.