डिंडिगुल – ७० वर्षाच्या निर्मला देवी बुधवारी मनरेगा कामाच्या साइटवर पायी चालत निघाल्या होत्या. तेव्हा रस्त्यात दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर निर्दयी हल्ला केला. इतकचं नाही तर या महिलेचं शिर कापून नेले आणि घटनास्थळाहून काही किमी अंतरावर एका घराबाहेर पोस्टरला टांगलं. हा पोस्टर पशुपति पांडियन याचा होता ज्याची हत्या २०१२ मध्ये करण्यात आली होती.
वयोवृद्ध महिलेची निर्दयी हत्या आणि शिर कापून घेऊन जाण्याच्या घटनेनं खळबळ माजली आहे. परंतु ही नवीन घटना नाही. दक्षिण तामिळनाडूत दोन गटांमध्ये जवळपास ३ दशकांपासून हा रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. पांडियन यांच्या हत्येच्या ९ वर्षात ही पाचवी हत्या आहे. महिलेची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांनी ६ विशेष पथक तयार केले आहे. गुन्हेगारी क्षेत्रातून पुढे येऊन दलित नेता बनलेल्या पशुपति पांडियनची हत्या १० जानेवारी २०१२ रोजी झाली होती. १२ पेक्षा अधिक हल्लेखोरांनी पांडियनचा गळा कापला होता. पांडियन याच्या हत्येनंतर आतापर्यंत या घटनेत ५ जणांची हत्या करण्यात आली आहे.
पांडियन याच्या हत्येनंतर ज्या ५ जणांची हत्या झाली ते सामान्य मोहरे होते परंतु यामागचा खरा चेहरा सुभाष पन्नईयार ज्याच्या हातात दुसऱ्या गटाचं नेतृत्व होतं. तो अद्यापही फरार आहे. २०१६ मध्ये सुभाषवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. ज्यात तो थोडक्यात बचावला परंतु त्याच्या एका सहकाऱ्याचा जीव गेला. २०१७ मध्ये सुभाषने कोर्टात सरेंडर केले परंतु त्यानंतर जामीनावर परत येत फरार झाला. गेल्या ३ दशकांपासून हा संघर्ष सुरू आहे. १९९० मध्ये दक्षिणी तामिळनाडूतील तूतीकोरिन जिल्ह्यात पन्नईयारांची लोकसंख्या होती. पन्नईयार हा तामिळ शब्द आहे ज्याचा अर्थ सावकार असा आहे. ब्रिटीश शासनाच्या काळात स्थानिकांना ही उपाधी दिली. जमीन आणि शेतीवर दावेदारी आणि वर्चस्व या काळात पशुपति पांडियन याचं नाव वेगाने चर्चेत आलं.
सावकार आणि पीडित गावकऱ्यांमध्ये संघर्ष
दलित आणि भूमिहिन यांच्याकडून सावकाराच्या जाचाला कंटाळून संघर्ष सुरू झाला. पांडियनने सुभाषचे वडील सुब्रामणियम पन्नईयार आणि अशुपति पन्नईयार यांची हत्या केली. त्यानंतर खूनी खेळ सुरू झाला. वडिलांच्या हत्येवेळी सुभाष कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. मात्र या घटनेनंतर तो चुलत भाऊ व्यंकटेशसोबत या दलदलित उतरला. सुभाष आणि व्यंकटेशनं पन्नईयार ग्रुप बनवला. दुसरीकडे पशुपती पांडियन हा दलितांचा नेता बनला. दोन्ही गटात पैसे आणि ताकद यांच्यासाठी संघर्ष सुरू होता. पन्नईयार डीएमकेत प्रवेश घेतला. व्यंकटेशची पत्नी राधिका सेल्वी २००४ मध्ये तिरुचेंदुर जागेवरुन खासदार म्हणून निवडून आली.
२००३ मध्ये व्यंकटेश पन्नईयार पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. भावाच्या हत्येनंतर सगळी कमान सुभाषच्या हाती आली. वहिनी खासदार झाल्यानं सुभाष पन्नईयारची राजकीय ताकद वाढली होती. २००६ मध्ये बदला घेण्याच्या उद्देशाने पन्नईयार गँगने पशुपती पांडियनच्या गाडीत बॉम्बहल्ला केला. पांडियन वाचला परंतु त्याची पत्नी मृत्युमुखी पडली. त्यानंतर १० जानेवारी २०१२ रोजी पन्नईयार गँगच्या १२ जणांनी पशुपती पांडियवर हल्ला करत त्याची हत्या केली. त्यानंतर आता ७० वर्षीय महिलेच्या हत्येनंतर पोलीस पन्नईयार आणि पांडियन दोन्ही गटाच्या हालचालींकडे पोलीस लक्ष ठेऊन आहेत.