जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याच्या वर्तकनगर भागातील एका हाॅटेलजवळ काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती पाेलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. या कारवाईमध्ये तीन पिडीत तरुणींची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी वर्तकनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील पाेखरण राेड क्रमांक एक शास्त्रीनगर सिग्नल जवळील ठाणे कॅटींन हाॅटेलजवळ एक महिला दलाल ग्राहकांच्या माेबाईलवरील व्हाॅटसअपवर पिडित तरुणींचे फाेटाे पाठवून देह विक्रयासाठी काही मुलींना पाठवित असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ पाेलिस निरीक्षक चेतना चाैधरी यांना मिळाली हाेती. त्याच माहितीच्या आधारे उपायुक्त पाटील आणि चाैधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, देवानंद चव्हाण, जमादार श्रद्धा कदम, वालघुडे, पाेलिस हवालदार किशाेर पाटील आणि हर्षदा थाेरात आदींच्या पथकाने २६ सप्टेंबर २०२४ राेजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर येथील ‘ठाणे कॅन्टीन’ च्या पहिला मजल्यावर सापळा रचून या दलाल महिलेला ताब्यात घेतले.
पाेलिसांच्या पथकाने याठिकाणी बाेगस ग्राहक पाठवून या महिलेशी साैदा केला. त्यावेळी तिने तीन तरुणींना देह व्यापारासाठी पाठविले. हा प्रकार उघड झाल्यानंतर बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर तिच्या तावडीतून तीन पिडित तरुणींची सुटका करण्यात आली. या महिलेविराेधात वर्तकनगर पाेलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३ (१), (३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील पिडीत तरुणींना मुंबईच्या कांदिवली येथील सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. गेल्या दाेन ते तीन वर्षांपासून ही दलाल महिला व्हाॅटसॲपवर फाेटाे पाठवून हे रॅकेट चालवित असल्याचे चाैकशीमध्ये उघड झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.