अकोला : जुने शहरातील रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी ४० वर्षीय महिलेची अज्ञात आरोपींनी गळा आवळून हत्या केल्याचे शनिवारी पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी नारायण मुरलीधर मानवतकर यांच्या शेजारी अकिलाबी नामक महिलेच्या घरात कल्याणी रामलाल बारोले (४0) ही महिला भाड्याने राहात होती. तिने हनिफ नवरंगाबादी नामक इसमासोबत निकाह केला होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास परिसरात दुर्गंधी पसरली. ही दुर्गंधी या महिलेच्या घरातून येत असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी जुने शहर पोलिसांना माहिती दिली. जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांनी घटनास्थळ गाठले आणि घर उघडले असता, घरामध्ये कल्याणी बारोले हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या महिलेची दोन ते तीन दिवसांपूर्वी अज्ञात मारेकºयांनी गळा आवळून हत्या केल्याचे उघड झाले. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी पहिल्या दिवशी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, हत्या झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी अज्ञात मारेकºयांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तिचा पती हनिफ नवरंगाबादी (रा. गवळीपुरा) आणि पवन वंजारी या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यातरमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी कल्याणी रामलाल बारोले हिच्या हत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी चारही बाजूने तपास सुरू केला असून, तिच्या पतीसह दोघांना ताब्यात घेतले आहे. महिलेच्या हत्येचे कारण गुलदस्त्यात असून, त्याचा लवकरच उलगडा करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.कल्याणी रामलाल बारोले हिच्या हत्येमागे नेमका कुणाचा हात आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिचा पती व आणखी एका युवकास ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.- अन्वर शेख, ठाणेदार, जुने शहर पोलीस स्टेशन.