नागपूर - दिराच्या आणि सासूच्या जाचाला कंटाळून एका महिलेने तिच्या तरुण मुलीसह अंबाझरी तलावाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी मध्यरात्री ही करुणाजनक घटना घडली. सविता राजू खंगार (वय ४५) आणि रुचिता राजू खंगार (वय २०) असे मृत मायलेकीचे नाव आहे. या दोघी सोबतच तलावावर गेलेल्या श्वेतल राजू खंगार (वय २२) हिने ऐनवेळी आत्महत्येचा विचार त्यागल्याने तिचा जीव वाचला.
या घटनेनंतर प्राथमिक तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, वाठोडा लेआउट मधील विद्या नगरात सविता राजू खंगार ही महिला राहत होती. पती कामावर निघून गेल्यानंतर तिची सासू आणि दिर तिला नेहमी शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. गुरुवारी दुपारी घरातील पंखा दुरुस्त करण्याच्या मुद्द्यावरून सविता यांचा तिच्या दिरासोबत वाद झाला. दिराने तिला मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. यामुळे सविता आणि तिच्या दोन्ही मुली कमालीच्या दुःखी झाल्या. त्यांची मानसिक स्थिती खराब झाल्यामुळे सुमारे १५ किलोमीटर दूर असलेल्या अंबाझरी तलावावर त्या पायी चालत गेल्या. रात्री ९ वाजता पासून सुमारे १२ वाजेपर्यंत सविता, तिची मुलगी रुचिता आणि श्वेतल या तिघी मायलेकी बसून होत्या. अचानक सविता आणि रुचिता या मायलेकींनी तलावात उडी घेतली. श्वेतलने आरडाओरड केली.
नंदनवनमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना फोन करून आई आणि बहिणीने तलावात उडी घेतल्याची माहिती दिली. नातेवाइकांनी नियंत्रण कक्षात फोन केला. तर नियंत्रण कक्षाने अंबाझरी पोलिसांना ही माहिती कळविली. यावेळी रात्रीचे १२.३० झाले होते. रात्रपाळीत गस्तीवर असलेले अंबाझरीचे ठाणेदार विजय करे आपल्या सहकार्यांसह लगेच तेथे पोहोचले. अग्निशमन दलालाही बोलावून घेण्यात आले. मध्यरात्रीच्या वेळ असूनही अग्निशमन दलाच्या जवानांनी गळ टाकून सविता आणि रुचिताचे मृतदेह पाण्याबाहेर काढून मेडिकल मध्ये पाठविले. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर वाठोडा लेआउट परिसरात खळबळ उडाली. वृत्त लिहिस्तोवर अंबाझरी पोलीस प्रकरणाचा तपास करत होते.