तिरुवनंतपुरम - केरळमध्ये पती-पत्नी यांच्यातील वादाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी अन्य पुरुषासोबत कारमधून जात असताना पतीने त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. पत्नीसोबत असलेला दुसरा व्यक्ती हा तिचा मित्र असल्याचं कळताच संतापलेल्या पतीने त्याच्या कारला आग लावली. या घटनेत पत्नीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर तिचा मित्र गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दक्षिणी केरळ येथील कोल्लम शहरात मंगळवारी रात्री ४४ वर्षीय महिला तिच्या मित्रासोबत कारमधून चालली होती. कारला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू झाला. कारमधील महिलेचा मित्र आगीत भाजला त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात पाठवले. पद्मराजन नावाच्या व्यक्तीने कथितपणे दुसऱ्या गाडीने पत्नीच्या कारचा पाठलाग केला. रात्री ९ च्या सुमारास कोल्लममधील चेम्मामुक्कू येथे त्याने पत्नीची कार रोखली, काही कळण्याच्या आत त्याने तिच्या वाहनावर पेट्रोल टाकले आणि आग लावली. आगीच्या विळख्यात पत्नी आणि तिचा मित्र अडकला. त्यात पत्नीचा मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पती पद्मराजन याला अटक करून चौकशीला सुरुवात केली आहे. पतीने हे पाऊल का उचलले याचा पोलीस शोध आहेत. पद्मराजनने पत्नी अनिला आणि तिचा मित्र सोनी यांना जीवे मारल्याचा आरोप आहे. या घटनेत कार पूर्णत: जळून खाक झाली आहे. आरोपी पतीने पत्नीवर हल्ला करण्यासाठी निर्जन स्थळ निवडले. आरोपी पद्मराजनने ज्या वाहनाने पत्नीच्या कारचा पाठलाग केला ते वाहनही आगीत जाळून टाकले. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याचा हा प्रकार असल्याचं पोलिसांनी सांगितले.
अनिला अनिश नावाच्या युवकासोबत पार्टनरशिपमध्ये बेकरी बिझनेस चालवायची, पद्मराजनला अनिलाच्या चारित्र्यावर संशय होता. या दोघांमध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे. अनिशसोबतची पार्टनरशिप तोडून टाक यासाठी पद्मराजन अनिलावर दबाव टाकायचा. बेकरीत जे पैसे मी गुंतवलेत ते परत द्या असं अनिश म्हणायचा. पद्मराजनने त्याचे दीड लाख रुपये १० डिसेंबरला देतो हे सांगितले पण तोपर्यंत बेकरीत जायचे नाही हे अनिशला बजावले तरीही तो बेकरीत जायचा. त्यामुळे अनिला आणि अनिश दोघांना संपवण्याचा डाव पद्मराजनने रचला. मंगळवारी बेकरी बंद करून अनिला अनिशसोबत कारमधून प्रवास करत असल्याचं त्याला वाटले. त्याने त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून निर्जनस्थळी हे त्यांना थांबवले आणि कारला आग लावली.