रविंद्र पाटील
बाजार भोगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव पैकी मोताईवाडी येथील मोताईदेवी मंदिरात नवरात्र बसलेली महिला बुधवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान कोणालाही न सांगता मंदिरातून निघून गेली आहे.
परिसरातील शेत शिवारात ग्रामस्थांकडून शोध मोहीम सुरू आहे. मात्र अजूनही या महिलेचा थांगपत्ता लागलेला नाही. या घटनेची नोंद कळे पोलिसात झाली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी मोताईवाडी येथील मोताईदेवीच्या मंदिरात इतर महिलांबरोबर संपदा नारायण बने (वय 40) ही महिला नवरात्र बसली होती. बुधवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही महिला समोरच असलेल्या ऊस शेतीकडे निघून गेली मात्र काही तरी काम असेल म्हणून ही महिला गेली असेल अशी समजूत करून मंदिरातील लोकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र जास्त वेळ झाला तरी ही महिला परत न आल्याने शंका निर्माण झाली त्यानंतर सर्वांनी शोध मोहीम चालू केली. मात्र दुसरा दिवस उलटला तरी अजूनही या महिलेचा थांगपत्ता लागलेला नसून बाजारभोगाव परिसरातील नागरिक, ग्रामस्थ व कळे पोलिसांकडून सध्या शोधमोहीम चालू आहे.