कॅन्सरसारखा (Cancer) गंभीर आजार कधी स्वप्नातही कोणाला होऊ नये. कॅन्सरच्या उपचारांसाठी खूप मोठा खर्च येतो. कॅन्सरसाठी लागणारा खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे लोक पब्लिक डोनेशनची मदत घेतात. पब्लिक डोनेशनमधून येणारा पैसा परत करावा लागत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांची बरीच मदत होते. अमेरिकेतील एका महिलेने खोटं बोलून पब्लिक डोनेशनमधून पैसे मिळवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमांडा क्रिस्टीन रिले (Amanda Christine Riley) नावाच्या महिलेने तिला कॅन्सर झाल्याचं खोटं सांगून लोकांकडून सात वर्षांपर्यंत डोनेशन मिळवलं. त्यानंतर जे सत्य समोर आले ते भयंकर आहे.
कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या अमांडा क्रिस्टीन रिले नावाच्या महिलेने तिला हॉजकिन्स लिम्फोमा (Hodgkin’s lymphoma) असल्याचं सांगितलं. 2012 मध्ये या 37 वर्षीय महिलेने स्वतःला कॅन्सर झाला असल्याचं सांगितलं. उपचाराच्या खर्चासाठी तिने ऑनलाईन डोनेशनही मागायला सुरुवात केली. याचदरम्यान लोकांनी त्या महिलेला सहानुभूती दाखवत तिला आर्थिक मदत केली. कॅलिफोर्नियातील सॅन जॉस इथं राहणार्या अमांडाने तिच्या खोट्या आजारपणाबद्दल लोकांना शंका येऊ नये म्हणून Lymphoma Can Suck It नावाचा ब्लॉग सुरू केला.
केस गेलेले फोटो आणि कॅन्सर स्ट्रगलच्या कथा लोकांना सांगायची. त्यामुळे या महिलेला तिच्या संघर्षात मदत करण्यासाठी लोकांनी तिच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली. 7 वर्षात एकूण 105,513 डॉलर्स म्हणजेच तब्बल 81 लाख 20 हजार रुपयांहून अधिक रक्कम तिच्या खात्यात जमा झाली. ही महिला कॅन्सरबद्दल तिच्या कुटुंबीयांशीही खोटं बोलली होती. महिलेची ही फ्रॉड स्कीम इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिसने 2019 मध्ये शोधून काढली होती. त्यानंतर महिलेवर वायर फ्रॉडचा आरोप लावण्यात आला होता.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिच्यावरील गुन्हा सिद्ध होऊन तिला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. तिला बनावट कॅन्सरच्या नावावर जमा केलेली सर्व रक्कम परत करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. तुरुंगातून सुटल्यानंतरही ती तीन वर्षे पोलिसांच्या देखरेखीखाली राहणार आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांनी तिच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले, त्यापैकी बहुतेक लोक तिचे कुटुंबीय, मित्र आणि चर्चमधील होते. याशिवाय काही निधी उभारणाऱ्यांमार्फतही तिला पैसे मिळाले होते. अशाप्रकारे तब्बल सात वर्ष ही महिला फ्रॉड करत राहिली आणि पैसे मिळवत राहिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.