विवाहबाह्य संबंधातून हरियाणात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेने पतीला ठार करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या मदतीने रक्त दाब कमी करणारे इंजेक्शन मागवले आणि नंतर या इंजेक्शनचा ओव्हर डोस देऊन पतीचा काटा काढला. पत्नीच्या या निर्दयी कृत्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यमुनानगर जिल्हातील मुन्सिबल गावातील रहिवासी असलेल्या नीटू याचा ४ जानेवारी रोजी एका शेतात मृतदेह आढळून आला होता. त्याच्या हातावर इंजेक्शन दिल्याच्या खुणा होत्या. नीटूने एखाद्या अमली पदार्थाचा ओव्हर डोस घेतला असावा, असा संशय पोलिसांना होता. मात्र तो कसलंही व्यसन करत नसल्याची माहिती नंतर पोलिसांना मिळाली. त्यानंतर शवविच्छेदन अहवालातून रक्त दाब कमी झाल्यामुळे नीटूचा मृत्यू हे स्पष्ट झालं.
संशय येताच पोलिसांनी नीटूच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असता ती एका व्यक्तीच्या जास्त संपर्कात असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनीच नीटूचा खून केल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान, नीटूच्या खुनाचा संशय येऊ नये म्हणून त्याची पत्नी यूट्यूबवर हत्येचे वेगवेगळे प्रकार शोधत होती. इंजेक्शन देऊन रक्त दाब कमी करून पतीचा खून करण्याची आयडिया आरोपींना यूट्यूबवरूनच मिळाली होती, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.