बिहार : इंस्टाग्राम रील्स बनवण्यापासून रोखल्याच्या कारणावरून बिहारमधील बेगुसराय येथे एका महिलेने पतीची हत्या केली. ही महिला इंस्टाग्राम रील्ससाठी व्हिडिओ बनवत होती, ज्याला तिच्या पतीने विरोध केला. महिलेचा राग अनावर झाला आणि तिने घरच्या मंडळींच्या मदतीने त्याची हत्या केली. काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
ही घटना खोडबंदपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या फाफौत गावात घडली. महेश्वर कुमार रे असे मृताचे नाव असून तो समस्तीपूर जिल्ह्यातील नरहान गावचा रहिवासी आहे. फाफौत गावातील असलेल्या राणी कुमारीने ६-७ वर्षांपूर्वी महेश्वरशी लग्न केले. महेश्वर हा कोलकाता येथे मजुरीचे काम करत होता आणि काही दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परतला होता. त्याची पत्नी राणी कुमारी ही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवत असे. ती सासरी असल्याचे कळताच तो फाफौत येथे तिच्या घरी गेला.
इंस्टाग्राम रील्सवरून त्याचे आणि पत्नीमध्ये भांडण झाले. तिने घरच्यांच्या मदतीने महेश्वरचा गळा दाबून खून केला. मृताच्या भावाने रात्री उशिरा महेश्वरला कोलकाता येथून फोन केला आणि फोनवर कोणीतरी दुसऱ्याच व्यक्तिने उत्तर दिले, तेव्हा ही घटना उघडकीस आली. भावाने त्याच्या वडिलांना ताबडतोब फाफौत गावात जाण्यास सांगितले, जिथे तो मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
महेश्वरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मृताच्या पत्नीला अटक केली. महेश्वर खरं तर कोलकाता येथे परतणार होता, परंतु कोलकाता येथे परतण्यापूर्वी त्याने सासरची भेट घेतली आणि त्याची पत्नी व सासरच्या मंडळींनी त्याची हत्या केली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.