मुंबई: सहार पोलिसांनी शादाब खान (२४) नामक तरुणावर सहकारी महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कर्मचाऱ्यांनी ट्रेकिंगचे आयोजन केले होते, त्यादरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
अंधेरी पूर्वस्थित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बदलापूरमधील कोंडेश्वर येथे ट्रेक आयोजित केला होता. त्यात तीन महिलांसह नऊ कर्मचाऱ्यांचा समावेश होता जे ७ जुलै रोजी बदलापूरला पोहोचले. तीन महिला, आरोपी आणि आणखी एक पुरुष सदस्य एका खोलीत, तर इतर दुसऱ्या खोलीत थांबले.
मध्यरात्रीनंतर जवळपास सगळेच झोपले. फक्त पीडित महिला, आरोपी आणि महिलांच्या खोलीतील एक अन्य पुरुष सदस्य पहाटे ३.३० वाजेपर्यंत गप्पा मारत होते. सकाळी पीडितेला झोप लागल्याने तिने ट्रेकला न जाता झोपण्याचा निर्णय घेतला. सर्व ट्रेकिंगला गेल्या नंतर मागे थांबलेला आरोपी खान याने पीडित झोपलेली असताना तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. जे पाहून तिला धक्काच बसला आणि ती रडायला लागली. त्यानंतर स्वतःची बॅग घेऊन ती फ्लॅटमधून निघून गेली. तिने ग्रुपमधील दुसऱ्या सदस्याला बोलावले, जो परत आला आणि तिने घडलेला प्रकार त्याला सांगितला.
मुंबईला परत येऊन हा प्रकार तिने कंपनीच्या एचआर विभागाला कळवला. कार्यालयाबाहेर ही घटना घडल्याने लैंगिक छळविरोधी समितीने तिला पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने सहार पोलिसांकडे जाऊन १३ जुलै रोजी खानविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायदा कलम ७४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर), ७५ (लैंगिक छळ) आणि ७६ (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) या कलमांखाली गुन्हा नोंदवला.