भालकी (जि. बीदर): महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तुगाव हालसी (ता. भालकी जि. बीदर) येथे शेतीच्या वादातून गाेळी झाडून एका महिलेची हत्या केल्याची रविवारी घटना घडली. कविता मोहन तुळजापूरे (वय ४०) असे मयत महिलेचे नाव आहे. याबाबत मेहकर पाेलिसांनी दाेघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत मेहकर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पाेलिसांनी सांगितले, तुगाव (हालसी) येथील अंबादास तुळजापूरे यांना १९९१ साली शासनाने गायरान जमीन कसण्यासाठी दिली हाेती. यावरच पत्नी सोनाबाई, मुलगा मोहन, सून कविता सर्व्हे नंबर २०७ मधील २ एकर २० गुंठे जमीन कसून उदरनिर्वाह भागवित हाेते. दरम्यान, भावकीतील बब्रुवान तुळजापूरे याने गेल्या पाच ते सहा वर्षापासून ही जमीन माझी असून, त्या जमीनीवर माझा हक्क असल्याचे सांगत वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली. रायफलीतून हवेत गोळीबार करून ठार मारेन अशी धमकी देत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
शनिवारी रात्री शेतात जावून बळजबरी शेताचा ताबा घेण्यासाठी बब्रुवान तुळजापुरे याने आपल्या नावाचा फलक शेतात लावून आला हाेता. लावलेले फलक मोहन तुळजापूरे यांनी काढला असता बब्रुवान तुळजापूरे, अमोल तुळजापूरे यांनी हवेत गोळीबार करुन मोहन तुळजापूरे यांना पळवून लावले. गावातील त्यांच्या घरी येत त्यांना मारहाण करताना पत्नी कविता हिने मोहनला वाचविण्याससाठी गेली. यावेळी बब्रुवान तुळजापुरे, अमोल तुळजापूरे याने रायफलीतील दोन गोळ्या झाडून कविता मोहन तुळजापूरे या महिलेची हत्या केली. घटनास्थळी मेहकर पोलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक सूर्यकांत करंजे, भालकी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक नंदकुमार मुळे यांनी भेट देऊन दाेघांना ताब्यात घेतले. मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बिदर येथे पाठविण्यात आला असून, अधिक तपास पोलीस प्रशासन करत असल्याचे मेहकरचे पाेउपनि. करंजे म्हणाले.