पाटणा - अनैतिक संबंधांच्या नादात नेपाळमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेने एक अत्यंत भयानक कारस्थान रचले. तिने तिच्या पतीची हत्या करण्यासाठी आपल्याच बॉयफ्रेंडला ६० हजार रुपयांची सुपारी दिली. मात्र मृत तरुणाच्या डायरीमधून मिळालेल्या पुराव्यांमुळे या सर्वांचे पितळ उघडे पडले आणि हे हत्याकांड उघडकीस येऊन आरोपी पकडले गेले. अनैतिक संबंधांमधून हत्येची ही घटना बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मधुबनीमधील जयनगरमध्ये गेल्या ३ सप्टेंबर रोजी एका २५ वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. जयनगर ठाण्यामधील बरही गावामध्ये काही ग्रामस्थांना कमला कालव्यामध्ये या युवाकाचा मृतदेह तरंगताना दिसल्याने त्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या प्रकरणाची चौकशी सुरू केली. घटनास्थळी पोलिसांना एक डायरी मिलाली ज्यामध्ये नेपाळी नंबर लिहिलेला होता. डायरीमधून मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर जयनगर पोलिसांनी या हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा केला. त्यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एएसपी डॉ. शौर्य सुमन यांनी सांगितले की, मृत दु:खहरण महरा हा नेपाळचा नागरिक होता. त्याची पत्नी हरिहर देवी हिचे जयनगरमधील मुकेश यादव नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून या नेपाळी दाम्पत्यामध्ये सतत वाद होत असत. अखेरीस हरिहर देवी हिने पतीची हत्या करण्याचे कारस्थान रचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरिहर देवी हिने पूर्ण योजनाबद्धरीतीने आपल्या पतीला जयनगर येथे आणले. त्यानंतर तिने तिचा बॉयफ्रेंड मुकेश यादव याला ६० हजार रुपये देऊन पतीची हत्या घडवून आणली.
मिळालेल्या माहितीनुसार मुकेश यादव याने आपले मित्र सरोजसोबत मिळून धारदार हत्याराने दु:खहरण महरा याची हत्या केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी मुकेश यादव जयनगर येथील डॉ. ए.पी. सिंह यांच्या क्लिनिकमध्ये नोकरी करत होता. यादरम्यान, क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी नेपाळमधून आलेल्या हरिहर देवी या महिलेशी त्याची मैत्री झाली. या दोघांमध्ये गेल्या दीड वर्षांपासून अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. दोघांच्या फोन कॉल्स डिटेल्सवरून हरिहर देवी ही जयनगरमधील सेलीबेली परिसरात मुकेशसोबत रात्रीची थांबत असल्याचे उघड झाले, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अनैतिक संबंधांमुळे पतीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या पत्नीला नेपाळ पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. तसेच तिच्या बॉयफ्रेंडचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे.