मुंबई : हिरे कारागिराला चाकूचा धाक दाखवून लुबाडण्याचा प्रकार दहीसर परिसरात गुरुवारी रात्री घडला होता. याप्रकरणी एका महिलेला दहीसर पोलिसांनी अटक केली असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उमा चित्रे ऊर्फ गुडिया (२७) हिला ताब्यात घेण्यात आले, तर तिच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
तक्रारदार रंजितकुमार कामंत (३१) हे दहीसर पूर्वच्या कंपनीत हिरे घासण्याचे काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार ते ११ जानेवारीला मालकाकडून अडीच हजार रुपये खर्चासाठी घेऊन घरी निघाले होते. ते दहीसर रेल्वेस्थानक परिसरात रात्री आल्यावर कृष्ण हॉटेलसमोर एक महिला, तिचा साथीदार आला. त्यांनी कामंतना थांबवत महिलेची पर्स हरवली आहे, ती शोधायला मदत कर, असे सांगितले. त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवून महिला कामंतचे खिसे चाचपडू लागली. तक्रारदाराने खिशातले अडीच हजार रुपये काढून स्वतःच्या हातात घेतले. तेव्हा चाकूचा धाक दाखवत महिलेने त्यांच्या हातातील पैसे काढून घेतले. त्यांच्या मानेला चाकू लावत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
तक्रारदाराने आरडाओरड केल्यामुळे लोक जमा झाले. त्या लोकांनाही या आरोपींनी चाकू दाखवून धमकी दिली. त्यामुळे त्यांच्या मदतीला कोणी आले नाही आणि ते दोघे रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघून गेले. तिथून दहीसर पोलिसांची गाडी आली आणि घडलेला प्रकार तक्रारदाराने त्यांना सांगितल्यावर आरोपी महिलेला पकडण्यात आले.