भोपाळ -पती-पत्नीने नात्यामधून एकमेकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र मध्य प्रदेशमधील भिंड येथील घटना ऐकून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. येथे एका महिलेने आधी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले. त्यानंतर पोटगीचा खर्चही घेत राहिली. दरम्यान पहिल्या पतीला तिच्या दुसऱ्या विवाहाची माहिती मिळताच तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. तसेच माझी पत्नी मला परत मिळवून द्या, म्हणून विनंती करू लागला. परिस्थिती पाहून पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या दुसऱ्या पतीलाही पोलीस ठाण्यात बोलावले. तिथे या महिलेने तिला तिचा पहिला पती आवडत नाही, असे सांगितले.
हा धक्कादायक प्रकार मेहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौहार गावात घडला आहे. येथील रहिवासी रामदास नावाच्या तरुणाचा विवाह २०१७ मध्ये भिंड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणीशी झाला होता. एक वर्ष सासरी राहिल्यानंतर ही महिला पतीसोबत दिल्लीमध्ये राहण्यासाठी आली. मात्र नंतर माहेरी गेल्यावर ती परत माघारी आली नाही. तसेच तिने पतीविरोधात खटला दाखल करून पोटगीची मागणी केली. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार पती तिला पोटगी म्हणून साडेतीन हजार रुपये देऊ लागला. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे एक वर्षानंतर महिलेने दुसऱ्या तरुणासोबत विवाह केला. मात्र तिने पहिल्या पतीकडून घटस्फोट घेतला नव्हता. त्यामुळे आता हे प्रकरण कोर्टात आहे.
दरम्यान, महिलेच्या दुसऱ्या पतीने सांगितले की, सदर महिला आधीपासून विवाहित आहे, हे त्याला माहिती नव्हते. महिला डीएसपी पूनम थापा यांनी सांगितले की, दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. महिलेने घटस्फोट न देता दुसरे लग्न केले आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई होईल.
हिंदू विवाह कायद्यातील कलम १३अ नुसार दुसरे लग्न करण्यापूर्वी घटस्फोट घेणे आवश्यक असते. तसेच घटस्फोट न घेता पती किंवा पत्नीने दुसरे लग्न केले तर तो भादंवि कलम ४९४ आणि ४२० नुसार गुन्हा ठरतो.