राजस्थानमधील धौलपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने सरकारी कर्मचाऱ्यावर नोकरीच्या बहाण्याने अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून वैद्यकीय तपासणी केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धौलपूरच्या बाडी येथे राहणाऱ्या एका महिलेचे चार वर्षांपूर्वी पतीसोबत भांडण झाले होते. यानंतर ती दोन मुलांना घेऊन माहेरी आली. तिथे घरकाम करून ती स्वतःचा व मुलांचा उदरनिर्वाह करत होती. याच दरम्यान, सहाय्यक विकास अधिकारी असलेल्या उमरेह गावातील सुरेंद्र सिंह याच्याशी तिची मैत्री झाली.
सुरेंद्रने महिलेला खूप मदत केली आणि हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली. सरकारी नोकरीच्या बहाण्याने गेल्या दोन वर्षांत अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. एवढंच नाही तर 1 लाख 65 हजार रुपये घेतले. यानंतर सत्य समोर येताच तिने त्याच्याकडे पैसे मागितले. यावर सुरेंद्रने धमक्या देण्यास सुरुवात केली.
पोलिसात तक्रार केल्यास त्याचे 36 तुकडे करेन, असे तो म्हणाला. घाबरलेल्या महिलेने बाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी आयपीसी कलम 420, 406, 376 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.