मुंबई : राजस्थानमधून मुंबईत विक्रीसाठी आणलेले २१ कोटी ६० लाख किमतीचे ७ किलो हेरॉइन गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) जप्त केले आहे. याप्रकरणी मानखुर्दच्या अमीना हमजा शेख ऊर्फ लाली (५३) या महिलेला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.राजस्थानच्या प्रतापगड, चित्तोडगढ येथून अफूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे व्यापारी मुंबईत रेल्वे व बसमार्गे मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती एएनसीच्या घाटकोपर युनिटच्या पोलीस निरीक्षक लता सुतार यांना मिळाली होती. हा ड्रग्जचा व्यवहार सायन कोळीवाडा येथील वडाळा टर्मिनल येथे होणार असल्याने पोलिसांना सापळा रचत लाली हिला ताब्यात घेतले. तिच्या झडतीत ७ किलो २०० ग्रॅम हेरॉइन मिळून आले आहे. लाली ही अभिलेखावरील गुन्हेगार आहे. मुंबईत यापूर्वीदेखील तिच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत. ती मानखुर्दच्या लल्लूभाई कम्पाउंडमध्ये राहते. हे तस्कर मुंबईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांना ड्रग्ज विकणार होते. त्यापूर्वीच गुन्हे शाखेने त्यांच्यावर कारवाई केली आहे. लाली हिने राजस्थानच्या देवलाई, नौगामा येथून हे ड्रग्ज मागवले होते. हेरॉईनची तस्करी करणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांची नावे लालीच्या चौकशीत समोर आली आहेत. त्यानुसार, पथकाचा तपास सुरू आहे. एएनसीचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. राजस्थान बनतेय ड्रग्ज तस्करांचे केंद्रएएनसीने ड्रग्ज तस्कराविरोधात धडक कारवाई करत, यावर्षी हेरॉइन तस्करीच्या ८ मोठ्या कारवाईत ९ जणांना जेरबंद केले आहे. यातील तीन आरोपी हे राजस्थानचे मोठे ड्रग्ज पुरवठादार आहेत. या तिघांकडून पोलिसांनी १६ किलो हेरॉइन जप्त केले होते. ज्याची बाजारात किंमत ४४ कोटी इतकी आहे. या कारवाईवरून राजस्थान हे तस्करांचे मोठे केंद्र बनत असल्याचे समोर येत आहे.
राजस्थानातून आलेले कोट्यवधींचे हेरॉइन जप्त; मुंबईत महिलेला अटक, २१ कोटींचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 7:19 AM