रतलाम – पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना तुम्ही ऐकली असेल परंतु रागाच्या भरात पतीने पत्नीचे नाक कापल्याची घटना घडली आहे. या जखमी महिलेले उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील हा प्रकार आहे. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे.
दारुड्या पतीच्या रोजच्या मारहाणीला कंटाळून पीडित पत्नीने घर सोडून कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. नवऱ्याकडून पोटगी मिळावी अशी मागणी पत्नीनं कोर्टात केली. पत्नीच्या या कृत्यानं पती चांगलाच भडकला होता. रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली त्यानंतर तिचं नाक कापलं. ही घटना रतलाम जिल्ह्यातील आलोट वाडीतील आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. तर जखमी पत्नीला उपचारासाठी जवळील एका रुग्णालयात भरती केले आहे. महिलेने पतीच्या छळाला कंटाळून घर सोडलं होतं.
काय आहे प्रकरण?
आलोट इथं राहणारी टीना मालीचं लग्न उज्जैन जिल्ह्यातील झुठावद गावातील दिनेश मालीसोबत झालं होतं. २००८ मध्ये हे दोघंही विवाह बंधनात अडकले. टीनानं सांगितले की, दिनेश काहीही काम करत नव्हता. लग्नाच्या काही महिन्यानंतर दिनेश दारू पिऊन यायचा आणि मला मारहाण करायचा. दिनेशच्या रोजच्या छळाला कंटाळून अखेर मी माझ्या मुलींना घेऊन माहेरी येऊन राहिली होती. याठिकाणी ती खानावळीचं कामकाज करून कमाई करायची. २०१९ ला टीनाने पतीविरोधात कोर्टात दावा दाखल केला. ही गोष्ट दिनेशला समजताच त्याने पत्नीवर केस मागे घेण्यासाठी दबाव बनवला.
रविवारी दुपारी अंजुमन कॉलनीस्थित टीनाच्या घरी आरोपी पती दिनेश पोहचला. त्याने टीना आणि तिच्या मुलींना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी आरोपीनं दातांनी पत्नीच्या नाकाला चावा घेतला आणि तिथून फरार झाला. शेजाऱ्यांच्या मदतीने जखमी टीनाला जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून घेत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आलोट पोलीस निरीक्षक नीरज सारवान म्हणाले की, टीना नावाच्या महिलेने तिचा पती दिनेशविरोधात तक्रार दाखल केली आहे. या दोघांचा वाद कोर्टात सुरू होता. मात्र या कारणानं पतीने पत्नीचा दाताने चावा घेतला. आरोपीला सध्या आम्ही ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितले.