अकाेला : पिंजर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील फेट्रा येथील रहिवासी महिलेला शेजारीच राहणाऱ्या एका महिलेने व तिच्या मुलीने २०१२ मध्ये जिवंत जाळले हाेते. या प्रकरणातील अटकेत असलेल्या आराेपी महिलेस जिल्हा व सत्र न्यायाधीश डी़. बी़. पतंगे यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली़. तर फरार असलेल्या तिच्या मुलीविरुद्ध पकड वाॅरंट जारी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. फेट्रा येथील रहिवासी साेनू संजय इंगळे यांचा तिच्याच शेजारी रहिवासी असलेल्या बेबी भारत श्रृंगारे व तिची मुलगी अनिता राजू धवसे यांच्यासाेबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला हाेता. या वादातूनच बेबी श्रृंगारे व तिची मुलगी अनिता धवसे या दाेघींनी २७ डिसेंबर २०१२ राेजी साेनू इंगळे या महिलेच्या अंगावर राॅकेल ओतून तिला जाळले हाेते. यामध्ये गंभीररित्या जळालेल्या साेनूचा त्याच दिवशी सर्वाेपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी पिंजर पाेलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३०७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पिंजर पाेलिसांनी करून दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी़. बी़. पतंगे यांच्या न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले. त्यापैकी दाेघे फितूर झाले. आराेपी बेबी श्रृंगारे हिच्याविरुद्ध आढळलेल्या ठाेस पुराव्यांच्या आधारे तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली़. तसेच ५ हजार रुपये दंड ठाेठावला असून दंड न भरल्यास आणखी एक वर्षाच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी विधिज्ञ ॲड़. शाम खाेटरे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पाेलीस अंमलदार प्रकाश खाडे यांनी कामकाज पाहिले.
महिला आराेपी कारागृहातच
साेनू इंगळे हिची जाळून हत्या करणारी आराेपी बेबी श्रृंगारे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करताच तिला अटक करण्यात आली़. तेव्हापासून आराेपी कारागृहात असून तिला न्यायालयाने आतापर्यंतही जामीन दिला नसल्याची माहिती आहे.
मृत महिलेचा पती फितूर
साेनू इंगळे हिचा पती संजय महादेव इंगळे व संताेष शंकर माेहिते हे दाेन साक्षीदार न्यायालयात फितूर झाले. त्यामुळे न्यायालयाने फितूर झालेल्या दाेन्ही साक्षीदारांवर कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली असून त्यांच्यावरही कारवाई हाेण्याची शक्यता आहे़
मृत्यूपूर्व बयाण महत्त्वाचे
गंभीररित्या जळालेल्या साेनू इंगळे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी दिलेल्या मृत्यूपूर्व बयाणात बेबी श्रृंगारे व अनिता धवसे यांनीच जाळल्याचे स्पष्ट केले हाेते. तसेच साेनूचे वडील कैलास वानखडे यांनीही या दाेघींचे नाव घेतले हाेते. त्यामुळे या दाेन बाबी न्यायालयात महत्त्वाच्या ठरल्या.