ठाणे - विटावा येथे विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने दुचाकी चालवत येऊन थेट वाहतूक पोलिसाला धडक देवून जखमी केलेल्या महिलेने स्वत:ची बाजू सावरण्यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसालाच टार्गेट केल्याचा प्रकार ठाण्यात घडला. या प्रकरणी महिलेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तिला अटक करण्यात आली. त्यामुळे या घटनेनंतर ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ या उक्तीचा प्रत्यय आला आहे.
कळव्याजवळ असलेल्या विटावा येथील गणपतीपाडा नाक्यावर दोन कारचालकांमध्ये सुरू असलेला वाद वाहतूक पोलीस सोडवत होते. त्यावेळी विटाव्याकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या आरोपी महिला दुचाकीस्वारला येथील वाहतूक पोलीस मोहिते यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव वेगात असलेल्या महिलेने मोहिते यांना धडक देऊन तेथून पळ काढला. यावेळी तिला रोखण्यासाठी स्थानिकांनी वाहतूक पोलिसाला मदत केली. या घटनेनंतर महिलेने कळवा वाहतूक पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस कॉन्स्टेबल मोहिते यांच्या तोंडावर चावी फेकून मारली. तिच्याविरोधात वाहतूक पोलिसाने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर काझी हिने फेक व्हिडीओ बनवून व्हायरल केला. नंतर तिला अटक करण्यात आली असून हा व्हिडीओ नेमका कोणी काढला, व्हायरल कुठून झाला, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.