मुंबई - अंबोली पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गेलेल्या महिलेने खाकी वर्दीही न पाहता चक्क महिलापोलिसांनाच चोप दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढ्यावरच न थांबता त्या महिलेने पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही धमकी दिली. या धक्कादायक प्रकारामुळे खाकीचा धाक उरलाय का? असा सवाल निर्माण करत आहे. या प्रकरणी आरोपी महिला रेश्मा मलिक हिच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवाड यांनी लोकमतशी बोलताना अद्याप आरोपी महिलेला अटक करण्यात आलेली नाही असे सांगितले. त्यामुळे ८ डिसेंबरला घडलेल्या या प्रकरणातील महिलेला अटक न केल्याने खाकी वर्दीची अब्रू राखण्यासाठी खाकी वर्दी का कचरत आहे अशी चर्चा सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रेश्मा मलिक यांनी त्यांनी केलेल्या लेखी तक्रारींवर काय कारवाई झाली याबाबत विचारपूस करण्यासाठी ८ डिसेंबरला अंबोली पोलीस ठाणं गाठलं. पोलीस ठाण्यात आलेल्या आरोपी रेश्मा मलिक यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांना भेटण्याची अनुमती मागितली. त्यावेळी पोलीस ठाण्यात दिवसपाळीत कर्तव्यावर असलेल्या सावनी सुबोध शिगवण यांच्यासह पोलीस निरीक्षक सरगर, महिला पोलीस शिपाई ज्योती पाडेकर उपस्थित होत्या. वरिष्ठ निरीक्षक भारत गायकवाड यांच्याकडे जाऊन रेश्मा मलिकने अर्ज दाखवत विचारणा केली. मात्र, काहीच कारवाई झाली नसल्याचे लक्षात येताच ती भडकली. तिने तुम्ही सगळे चोर आहे, तुम्ही गुन्हेगारांना पाळता, तुमच्यामुळे माझी प्रकृती बिघडली आहे. मी कुणालाही सोडणार नाही अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार दुपारी अडीजच्या सुमारास घडला.
त्यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला शांत राहण्याचा सल्ला दिला. तर प्रकरण शांत करण्यासाठी रेश्मा मलिक हिला पोलीस शिपाई ज्योती यांनी बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त महिलेने पोलीस ठाण्यातच पोलिसांना आया-बहिणींवरून शिवीगाळ केली. त्यावेळी महिला पोलीस शिपाई ज्योती यांनी तिला बाहेर नेले असता ज्योतीला आरोपी रेश्मा मलिक हिने मारहाण केली. महिला शिपाई ज्योतीने रेश्माच्या कानाखाली मारली. हा सगळा प्रकार पाहून अन्य ३ महिला पोलीस शिपाई वाघमारे, फापाळे आणि बच्छाव यांनी महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर आरोपी महिलेने महिला पोलीस शिपाई वाघमारे यांचे केस पकडले आणि पोटावर लाथा मारल्या, वाघमारे यांच्या मदतीला धावून आलेल्या बच्छाव यांनाही मारहाण केली. तसेच अन्य एका महिला पोलिसालाही मारहाण करून शिवीगाळी केली. उपस्थिती सर्वांनीच महिलेला आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र ती एकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. एवढ्यावरच ती थांबली नाही तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांना अश्लील शिवीगाळी केली. आणि बघून घेईन अशी धमकी दिली. आरोपी रेश्मा मलिक हिला पोलिसांनी कूपर रुग्णालयात नेले तिथे देखील मलिक यांनी तमाशा केला. रेश्मा मलिक यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात मारामारी आणि शिवीगाळी, धमकी देणे तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.