अलिबाग : न्यायालयात एका महत्वाच्या पदावर असताना कामात चौकसपणा ठेवून त्या निवृत्त झाल्या. न्यायालया सारख्या शासकीय कार्यालयात मुख्य पदावर काम करून निवृत्त झालेली कोर्ट सुपरिटेडेंट महिला सरप्राइज गिफ्टच्या हव्यासापोटी फसली गेल्याची घटना अलिबागमध्ये घडली आहे. यामुळे या घटनेवरून हसावे की रडावे, अशी गत या महिलेची झाली आहे. या महिलेने एका परदेशी व्यक्तीच्या नादाला लागून सराप्रायाझ गिफ्टपायी १ कोटी १२ लाख रुपये गमावले आहेत. या फसवणुकीबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे या महिलेने यासाठी कर्जही काढले आहे.
अलिबाग येथे राहणारी एक महिला २०२१ ला कोर्ट सुपरिटेडेंट म्हणून निवृत्त झाली. या महिलेचे फेसबुक या सोशल साईटवरही खाते होते. फेसबुकवर तिला एका इंग्लंडमधील इसमाची मैत्रीची रिक्वेस्ट आली आणि तिथेच ती फसली. त्या इसमाने गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्याच्या गोड बोलण्यात महिला पूर्णपणे फसली याची खात्री झाल्यावर त्याने तिला गंडवण्याचा बेत आखला. या इसमाने आपल्या योजनेत अजून सहा जणांना घेतले.
इंग्लंडमधून तुला सरप्राईज म्हणून गिफ्ट पाठविले असल्याचे तिला सांगण्यात आले. कस्टम ऑफीस, दिल्ली येथे आलेले गिफ्ट पार्सल सोडविण्याकरीता, गिफ्ट टॅक्स, गिफ्टमध्ये असलेली करन्सी एक्सचेंज टॅक्स, त्याचप्रमाणे गिफ्ट पार्सल मध्ये सोने व करन्सी असून इंडीयन रुपयात याची किमत 99 लाख रुपये असल्याचे पटवून देण्यात आले. गिफ्टमध्ये असलेली करन्सीची रक्कम फिर्यादीने खात्यात जमा करण्यासाठी या महिलेला एकूण किती पैसे भरायचे आहेत याबाबत सांगीतले. जवळ जवळ एक कोटी एवढी मोठी रक्कमेची समोरुन अनोळखी माणसे मागणी करत असतानाही, या महिलेला संशय आला नाही, हे विशेष.
सरप्राइज गिफ्टच्या हव्यासापोटी अलिबाग येथील बॅक महाराष्ट्र, स्टेट बॅक ऑफ इंडीया या बॅकेमधील पेन्शन खाते, बचत खात्यातून पैसे काढले तर पैसे कमी पडत असल्याने आपले सोने तारण ठेवून महिलेने कर्ज काढले आणि तब्बल १ कोटी १२ लाख ९२ हजार ८०० रुपये इतकी रक्कम कोणताही विचार न करता त्या इसमाच्या खात्यांमध्ये जमा केली. आणि डोक्याला हात लावून बसली.
सरप्राइज गिफ्ट काही पोहचलेच नाही आणि सर्व पुंजी त्या इसमाला देऊन फसली. इसमही गायब झाल्याने अखेर महिलेने आर्थिक शाखेकडे धाव घेऊन घडलेला प्रकार सागून तक्रार दखल केली. पोलीसांनी भा.दं.वि.क. ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल लाड करीत आहेत.