नवी दिल्ली – पीएनबी(PNB Bank Scam) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला(Mehul Choksi) डॉमिनिका येथे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र चोक्सी डोमिनिकाला कसा पोहचला यावरून अनेक तर्क लढवले जात आहेत. मेहुल चोक्सी त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी डॉमिनिकाला गेला होता असा दावा करण्यात आला. परंतु आता या प्रकरणात वेगळंच सत्य उघड होत आहे.
मेहुल चोक्सी डॉमिनिकाला पोहचला तेव्हा त्याच्यासोबत एक महिला होती परंतु ती त्याची गर्लफ्रेंड नव्हती तर त्याचं अपहरण करणाऱ्या टोळीची सदस्या होती. या टोळीने मेहुल चोक्सीचं अपहरण केले त्याच्यासोबत मारहाण केली. त्यानंतर चोक्सीला डॉमिनिका येथे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सी अँटिग्वा आणि बरबुडा येथून गायब झाला होता. त्यानंतर तो डॉमिनिका येथे असल्याचं समोर आलं. याठिकाणी त्याला अटक केली.
मेहुल चोक्सीच्या वकिलांनी दावा केलाय की, २३ मे रोजी मेहुलचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण करणाऱ्या लोकांचं भारतासोबत कनेक्शन आहे आणि ते अँटिग्वा येथील अधिकाऱ्यांच्या मदतीनं हे अपहरण झालं. अपहरण करणाऱ्यांनी मेहुल चोक्सीला मारहाण केली. त्याला टॉर्चर केले. त्यानंतर एका बोटीच्या सहाय्याने डॉमिनिकाला आणलं गेले. त्याठिकाणी चोक्सीला अटक झाली. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अपहरणात सहभागी असलेली महिला अँटिग्वा येथे राहत होती. या महिलेने सुरुवातीला मेहुल चोक्सीसोबत ओळख केली. सकाळी, संध्याकाळी मेहुल बाहेर फिरण्यासाठी जात होता तिथेच या महिलेने सापळा रचला होता. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली. २३ मे रोजी या महिलेने मेहुल चोक्सीला ती राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये भेटण्यासाठी बोलावले. मेहुल ज्यावेळी तिच्या घरी पोहचला तेव्हा अपहरण करणारे अन्य साथीदार तिथेच होते. या सगळ्यांनी मेहुलचं अपहरण करून त्याला डॉमिनिकाला आणलं.
रविवारी अँटिग्वा आणि बरबुडा पंतप्रधान ग्रॅस्टोन ब्राऊनने सांगितले की, मेहुल चोक्सी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत डॉमिनिकाला गेला होता. तिथे त्याला पकडण्यात आलं. ग्रॅस्टन यांनी डॉमिनिका सरकारला आवाहन करून मेहुल चोक्सीला थेट भारतात पाठवलं जावं असं म्हटलं. शनिवारी रात्री पोलीस कोठडीत असलेल्या मेहुल चोक्सीचे फोटो व्हायरल झाले. फोटोत मेहुल चोक्सी जेलच्या कोठडीत होता आणि त्यांच्या हातावर मारहाण झालेल्या खूणा दिसून येत होत्या. त्याचसोबत त्याचे डोळे लाल झाले होते आणि शरीरात थकवा असल्याचं जाणवत होतं.
प्रत्यार्पणाविरुद्ध करणार अपील
मेहुल चोक्सी याचे वकील विजय अगरवाल यांनी लोकमतला सांगितले की, चोक्सी याचे बेकायदेशीररीत्या प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरुद्ध डॉमिनिका न्यायालयात अपील केले जाईल. डॉमिनिकामध्ये ब्रिटिश कायदे लागू असून, त्यात मानवाधिकाराची काळजी घेतली जाते. अगरवाल यांनी सांगितले की, चोक्सी हा अँटिग्वाचे नागरिक असून, तो डॉमिनिकात स्वत:च्या इच्छेने गेलेला नाही. त्यांला तेथे कसे नेले गेले याचा आम्ही शोध घेत आहोत. अँटिग्वाच्या उच्च न्यायालयाने चोकसी याचे प्रत्यार्पण होऊ शकत नाही, असा निकाल यापूर्वीच दिला आहे.