आसाममध्ये बलात्काराची अतिशय धक्कादायक घटना कोरोनातून नुकतीच बरी झालेल्या महिलेसोबत घडली आहे. दोन दिवसानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. आसामच्या चराईदेव जिल्ह्यात नुकतीच कोरोनामुक्त झालेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातून पायी घरी परत येत असताना दोन नराधमांनी या महिलेला रस्त्यात गाठलं आणि तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले. या पीडितेचे कुटुंब सध्या रुग्णालयात कोविड संसर्ग झाल्याने उपचार घेत आहे.
पीडित महिलेची कोविडची चाचणी निगेटिव्ह आल्याने तिला १ आठवड्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पीडित महिलेला रुग्णालय प्रशासनाने ऍम्ब्युलन्स देण्यास नकार दिल्याने तिला पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्या मुलीसोबत ती रुग्णालयातून घरी परतत होती. दरम्यान, दोन भामट्यांनी महिलेचं अपहरण केलं आणि तिला जवळच्या चहाच्या बागेत नेऊन रात्री ७ वाजता आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुधाकर सिंग यांनी दिली आहे. ही घटना २७ मे रोजी घडली आणि दोन दिवसानंतर या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
जिल्ह्यातील सपेखती मॉडेल रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर माझ्या आईची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. ती चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दुपारी २. ३० वाजण्याच्या सुमारास आम्हाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आम्ही घरी जाण्यासाठी रुग्णालयाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र त्यांनी रुग्णवाहिका मिळणार नसल्याचं सांगितलं. कोरोना कर्फ्यू असल्यानं आम्ही आजची रात्री रुग्णालयात राहू शकतो असं रुग्णालय प्रशासनाला विचारले. त्यावरही रुग्णालयातल्या प्रशासनानं नकार दिला, त्यानंतर आम्हाला नाईलाजास्तव पायी घरी जावे लागले, असं पीडित महिलेच्या मुलीने म्हटले आहे.
दरम्यान,आम्ही चालत असताना दोन जणांनी आमचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यांना बघून आम्ही पळण्यास सुरुवात केली. पण त्यांनी माझ्या आईला पकडलं आणि तिला घेऊन गेले. मी धावत जाऊन गावकऱ्यांना झालेला प्रकार सांगितला. तब्बल दोन तासांनंतर माझ्या आईचा शोध लागल्याची माहिती पीडित महिलेच्या मुलीने दिली.
दोन्ही आरोपींना पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यांवरून सोमवारी सकाळी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. तसेच पीडित महिलेचे वैद्यकीय अहवाल देखील येणं शिल्लक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.