ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दहाच्या बाजूला असलेल्या मोकळया जागेतून दीड वर्षाच्या पूजा या मुलीचे अपहरण गुरुवारी पहाटेच्या सुमारास झाले होते. सीसीटीव्हीच्याआधारे मोठया कौशल्याने शाहीस्ता शेख (30) आणि तिचा साथीदार अल्पवयीन आरोपी या दोघांना कोपरी पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.
कचरा वेचून ठाणे रेल्वे स्थानक परिसरातच वास्तव्य करणारी राधा अंबादास मुळेकर (27) ही महिला 11 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक दहाच्या बाजूला असलेल्या मोकळया जागेत झोपलेली होती. पूजा आणि तीन वर्षाचा चंदू ही दोन्ही मुलेही तिच्यासमवेत त्यावेळी होती. दरम्यानच्याच काळात एका महिलेने आणि तिच्या सोबत असलेल्या अनोळखी मुलाने यातील मुलीचे अपहरण केल्याची बाब तिला तिथे जवळच असलेल्या इतर लोकांनी सांगितली. हा प्रकार लक्षात येताच प्रचंड घाबरलेल्या अवस्थेतच तिने पहाटेच्याच सुमारास कोपरी पोलीस ठाणो गाठले. उपायुक्त अंबुरे आणि सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर, निरीक्षक दत्ता गावडे तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी तातडीने तीन वेगवेगळी पथके तयार केली. घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सपकाळे आणि जमादार भोसले आदींच्या पथकाने वर्तकनगर येथील आकृती अपार्टमेंट येथून शाहीस्ता शेख आणि तिचा साथीदार विक्की या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कौशल्याने केलेल्या चौकशीतून त्यांनी गुन्हयाची कबूली दिली. त्यानंतर अपहरण केलेल्या पूजाची त्यांच्याच घरातून पोलिसांनी सुटका केली. अत्यंत अल्प कालावधीमध्ये कोणताही धागादोरा नसतांना मोठया कौशल्याने या मुलीच्या अपहरणाचा तपास करणाऱ्या कोपरी पोलिसांचे अंबुरे यानी विशेष कौतुक केले. आपली मुलगी अपहरण करणाऱ्यांच्या तावडीतून पुन्हा सुखरुप मिळाल्यामुळे राधा मुळेकर या महिलेनेही समाधान व्यक्त केले.