शाहजहापूर: सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकानं बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहापूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी अपर पोलीस महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जलालाबादमध्ये राहणारी एका ३५ वर्षीय महिलेनं तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार केल्याची माहिती पोलीस क्षेत्राधिकारी ब्रह्मपाल सिंह यांनी दिली. 'महिलेनं दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबरला मदनपूरला जात असताना ती प्रवास करत असलेली ई-रिक्षा खराब झाली. त्यानंतर ती पायी चालू लागली. त्याचवेळी कारमधून आलेल्या पाच जणांनी तिला जबरदस्तीनं शेतात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला,' असं सिंह यांनी सांगितलं.आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दाखल करण्यासाठी जलालाबाद पोलीस ठाण्यात गाठलं असता तिथे असलेल्या निरीक्षक विनोद कुमार यांनी खोलीत नेऊन बलात्कार केल्याचा दावा महिलेनं केल्याचं ब्रह्मपाल सिंह यांनी सांगितलं. पीडित महिलेनं बरेलीचे अपर पोलीस महासंचालक अविनाश चंद्र यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास गुन्हा कठोर कारवाई करण्याचं आश्वासन चंद्र यांनी दिलं.याआधी एटा जिल्ह्यातल्या बागवाला भागात महाविद्यालयात जात असलेल्या एका बीएससीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. दिवसाढवळ्या चालत्या टेम्पोमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी बागवाला पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३६४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला आणि टेम्पो चालकाला अटक केली.
धक्कादायक! सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवण्यास गेलेल्या महिलेवर पोलीस ठाण्यात बलात्कार
By कुणाल गवाणकर | Published: December 25, 2020 11:39 AM