मुंबई - मालाड येथील अक्सा बीचवर बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. तब्बल सहा दिवसांनंतर या हत्येची उकल करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी महिलेच्या सासऱ्याला आणि दोन रिक्षाचालकांना अटक केली आहे. या प्रकरणी कमल, गुप्ता आणि सिंह या तिघांना पोलिसांनी अटक केली. नंदिनी ठाकूर (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. नंदिनीचा विवाह तीन वर्षांपूर्वी पंकज राय याच्याशी झाला होता. आंतरजातीय विवाह असल्याने पंकजच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. पंकजचे वडील कमल (५५) यांना या लग्नामुळे त्यांच्या बिहारमधील मूळगावी अपमान सहन करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी काही महिन्यांपूर्वीच नंदिनीच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी एका रिक्षाचालकाला १ लाख रुपयांची सुपारी दिली होती, असे कमलने पोलिसांना सांगितले.मालवणी पोलिसांना २४ डिसेंबर रोजी अक्सा बीचवर एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. तिच्या हातावर टॅटू होता. तिच्या गळ्यात नेकलेस आणि मंगळसूत्रही होते. त्यानंतर कांदिवली पूर्वेतून ती महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. समता नगर पोलीस ठाण्यात तिचा फोटो होता. तिच्या गळ्यात तशाच प्रकारचा नेकलेस आणि मंगळसूत्र होते, अशी माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातूनच या हत्येचा छडा लागला. पोलीस तपास केला असता मृत महिलेचा पती पंकज आणि त्याची आई हे छटपुजेसाठी बिहारला गेले होते. त्यावेळी नंदिनी आणि तिचा सासरा कमल हे दोघेच घरी होते. कमलकडे चौकशी केली असता, त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळत होती. कमलच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता पोलिसांनी बऱ्यापैकी माहिती मिळाली.
९ डिसेंबरच्या रात्री कमल संपूर्ण रात्रभर रिक्षाचालक प्रदीप गुप्ता याच्यासोबत होता. त्यानंतर गुप्ता हा उत्तर प्रदेशात निघून गेला होता. गुप्ता आणि आणखी एक रिक्षाचालक कृष्णकांत सिंह हे ९ डिसेंबरला कमलच्या घरी आले होते. त्यांनी नंदिनीला पकडून ठेवले. त्यानंतर एकाने उशीने तिचे तोंड दाबले. तिचा मृत्यू झाल्यानंतर बेडशीटमध्ये तिचा मृतदेह गुंडाळला आणि बॅगमध्ये भरला. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह समुद्रात फेकून दिला, अशी माहिती मालवणी पोलिसांनी दिली.