नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या गाजीपूर परिसरात एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली आहे. हा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवून जाळण्यात आला होता. पोलीस तपासात या महिलेची हत्या गळा दाबून झाली होती आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी सुटकेसमध्ये मृतदेह टाकून जाळला होता. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी शोध घेत २ आरोपींना अटक केली आहे.
घटनास्थळापासून दूर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कार आढळली, त्यावरील नंबरवरून पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला. त्यानंतर आरोपी अमित तिवारीसह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. तपासत आढळले की, २५ जानेवारीला आरोपीनी महिलेची खोडा कॉलनी येथील तिच्या घरी गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सुटकेसचा वापर केला. मृतदेह सुटकेसमध्ये भरून गाजीपूरच्या रस्त्यावर सुटकेस जाळून टाकली. त्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला.
अमित तिवारी आणि त्याचा साथीदार खोडा कॉलनी परिसरातच राहतात. विशेष म्हणजे, २६ जानेवारीला हायअलर्ट असल्याने दिल्लीत सर्वच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख होती. त्यात गाजीपूर भागात महिलेचा मृतदेह सापडल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर कारवाई करत २ आरोपींना अटक केली.
का केली हत्या?
या घटनेतील पोलीस तपासात हैराण करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपी हा मृत महिलेचा चुलत भाऊ असून तो कॅब ड्रायव्हर आहे. महिलेचं दुसऱ्या धर्मातील युवकासोबत अफेअर सुरू होते, त्यामुळे तिचं लग्न सुरतमध्ये करण्यात आले होते. मात्र ती दुसऱ्या धर्माच्या मुलासोबत पळून गेली त्या रागातून ही हत्या झाल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, दुसऱ्या धर्मातील युवकासोबत पळालेल्या महिलेला काही दिवसांनी त्या युवकानेही सोडले. त्यानंतर ती चुलत भावाकडे राहायला आली होती. तेव्हा चुलत भावाने संधी मिळताच महिलेची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने १२०० रुपयांची नवीन बॅग खरेदी केली. त्यानंतर कारमधून एका निर्जनस्थळी घेऊन जात तिला आग लावली. पोलीस या घटनेचा आणखी तपास करत असून हत्येमागील आणखी काही कारणे आहेत का याचा शोध घेत आहे.