उरण - उरण तालुक्यातील पिरकोन- सारडे गाव परिसरातील रस्त्यालगत सोमवारी एका अनोखळी महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. उरण पोलिस वरिष्ठांसह घटनास्थळी दाखल झाले असून, या महिलेच्या हत्येप्रकरणी तपासकामी तातडीने तीन पथके तयार केली असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी दिली.
पिरकोन - सारडे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत सोमवारी सकाळी सुमारे ३०-३५ वयाच्या एका विवाहित महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला. पिरकोन गावातील नागरिकांनी याप्रकरणी गांभीर्य ओळखून सदर खळबळजनक घटनेची माहिती तत्काळ उरण पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपायुक्त पंकज डहाणे, न्हावाशेवा बंदर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर, उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना विवाहित महिलेचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. तिची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, तसेच गुन्ह्याची उकल करण्यासाठी मदत मिळावी यासाठी डॉगस्कॉड, फिंगरप्रिंट पथकालाही पाचारण केले होते.
स्थानिक नसल्याचा संशय विवाहिता परिसरातील नसावी, तर उरणबाहेरून हत्या करून मृतदेह रात्रीच्या वेळी गाडीतून रस्त्यावर टाकून अज्ञातांनी पलायन केले असावे, अशी शक्यता क्षीरसागर यांनी व्यक्त केली. तातडीने तपास करण्यासाठी तीन पथके तयार केली असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले. मात्र, महिलेच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे