रायगड ः अलिबाग येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना एक लाख रुपयांची लाच स्विकारल्याने त्यांच्यासह लेखापालासही अटक करण्यात आली आहे. अन्न धान्य पुरवठ्याची बिले मंजूर करण्यासाठी तब्बल चार लाख 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली हाेती. रायगड जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला सदाशिव पाटील, कंत्राटी लेखापाल भूषण रामचंद्र घारे अशी आराेपींची नावे आहेत. सरकारी अधिकाऱ्यावरील कारवाई करण्याची गेल्या पंधरा दिवसातील तिसरी घटना आहे.
अलिबागच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई केली. सृष्टी एंटरप्राइजच्या वतीने सरकारी कृपा महिला वसतिगृह कर्जत आणि सरकारी कृष्ठरोगी भिक्षेकरी गृह कोलाड येथे अन्न धान्य पुरवण्यात आले हाेते. याबाबतची बिले मंजूर करण्यासाठी आरोपी उज्वला पाटील यांनी तब्बल चार लाख 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली हाेती. याबाबत तक्रारदार याने अलिबागच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली हाेती. त्यानंतर आज दुपारी एक वाजता सापळा लावण्यात आला. पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये आरोपी उज्वला पाटील यांनी तक्रारदारास टेबलवर ठेवण्यास सांगून स्वीकारले. त्यानंतर आरोपी भूषण घारे यांच्या ताब्यात सदरची रक्कम मिळून आली.