नितीन पंडित
भिवंडी: केडीएमसी सोने हॉलमार्क करून देण्याच्या बाहाण्याने व सोने तारण ठेऊन नवीन सोने बनवून देतो असे सांगून गावातील महिलांची साडेचार लाख रुपयांच्या ११० तोळे सोने व रोख रक्कमेचा फसवणूक करून सोनार फरार झाले असल्याची घटना भिवंडीतील दिवेअंजुर गावात घडली आहे.याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी सोमवारी दोन भामट्या सोनारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रहेमतसिंग खेमसिंग दसाणा वय ३१ वर्ष व गोपाल वर्दी सिंग वय २१ वर्ष दोघेही रा.काल्हेर असे महिलांचे सोने घेऊन पसार झालेलता दोघा भामट्या सोनारांची नावे आहे. या दोन भामट्या सोनारांनी हायवे दिवे गावात कल्पतरू गोल्ड नावाने सोन्याचे दुकान उघडले होते.या दुकानात ते सोने तारण ठेवत होते.त्याचबरोबत केडीएम सोने हॉलमार्क करून देतो असे सांगून महिलांचे सोने स्वतःकडे ठेवत होते तसेच गावातील नागरिकांना नवीन सोने बनवून देतो असे सांगून गावातील नागरिकांकडून रोख रक्कम देखील घेतली होती.
सप्टेंबर २०२२ ते जुलै २०२३ या एका वर्षाच्या काळात या दोघा भामट्यांनी गावातील महिलांचे ४ लाख ४० हजार रुपयांचे ११० तोळे सोने जमा केले होते. हे सोने व रोख रक्कम घेऊन दोघेही भामटे पसार झाले आहेत.याप्रकरणी राजश्री रामलाल पाटील वय ३६ वर्ष रा. दिवे अंजुर या महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात रहेमतसिंग व गोपाल या दोघा भामट्या सोनारांविरोधात सोमवारी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.हे दोघे भामटे पसार झाले असून याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन पाटील अधिक तपास करीत आहेत.