नागपूर - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असेलल्या एका महिला डॉक्टरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी १०.३० वाजता येथील मार्डच्या हॉंस्टेलमध्ये ही घटना उघडकीस आली. त्यामुळे हॉंस्टेल परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विनी मयूर शिंदे (वय २६) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर महिलेचे नाव आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. अश्विनी मुळच्या बीड येथील रहिवासी आहेत. त्या डीओआरएल अभ्यासक्रमासाठी नागपुरात आल्या होत्या. मेडिकल परिसरातील मार्डच्या हॉंस्टेलमध्ये ४२ क्रमांकाच्या रूममध्ये त्या राहत होत्या. डॉ. श्रुती तागडे आणि अन्य एक अशा दोन मैत्रीणी त्यांच्यासोबत राहायच्या. आज सकाळी १० वाजले तरी डॉ. अश्विनी लेक्चरला पोहचल्या नाही. त्यामुळे डॉ. श्रुती त्यांच्या रूमवर गेल्या. दार आतून बंद असल्यामुळे बराच वेळ त्यांनी दार ठोठावले. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बाजुच्या खिडकीतून त्यांनी डोकावून बघितले असता अश्विनी पलंगावर पडली असल्याचे दिसले. त्यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते. त्यामुळे डॉ. श्रुती यांनी आरडाओरड करून बाजुच्यांना गोळा केले. हॉंस्टेलच्या कर्मचाऱ्यांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. गंभीर अवस्थेतील डॉ. अश्विनी यांना तातडीने अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी स्वत:चा गळा सर्जिकल ब्लेडने कापून घेतल्याचा अंदाज आहे. बराच रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची अवस्था चिंताजनक आहे.