मुंबई - डिजिटल पेमेंट ऍपच्या मदतीने आर्थिक व्यवहार सोपे झाले असले तरी त्यातून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुगल- पेद्वारे कांदिवली येथील चारकोपमध्ये राहणाऱ्या एका महिलेला १ लाख ४८ हजारांना गंडा घातल्याचे उघडकीस आलं आहे. या प्रकरणी चारकोप परिसरात गुन्हा नोंदवला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
कांदिवलीत राहणाऱ्या तक्रारदार ४३ वर्षीय महिला ऑनलाईनद्वारे कपडे खरेदी विक्रीचा व्यवसाय करते. २८ ऑगस्ट रोजी तिला तिच्या एका मैत्रीणीने फोन केला. या मैत्रीणीने एका अज्ञात ग्राहकाला कपडे खरेदी करायचे असून तो आगाऊ रक्कम देण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र, मैत्रिणीने तिचं गुगल पे चालत नसल्याने तक्रारदार महिलेला तिची ऑर्डर स्वीकारण्यास सांगितली. त्यानुसार पीडितेला अज्ञात व्यक्तिचा फोन आला. फोनवरील व्यक्ती पीडित महिलेशी कपड्यांविषयी बोलत असताना पीडित महिलेच्या मोबाइलवर अचानक खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज येऊ लागला. पीडित महिलेने सुरूवातीला दुर्लक्ष केले. मात्र अनेकदा मेसेज येऊ लागल्याने तिचे मेसेज वाचले. खात्यातून पैसे निघून जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने फोन कट करून बँकेत फोन लावून व्यवहार थांबवले. मात्र, तोपर्यंत तक्रारदार महिलेच्या खात्यातून आरोपीने १ लाख ४८ हजार रुपये काढले होते. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदार महिलेने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.