मुंबई - लग्न जुळविणाऱ्या मेट्रोमोनियल साईडवर ओळख होऊन लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडल्याचे पवई पोलीस ठाण्याच्याहद्दीत उघडकीस आले आहे. पवई पोलिसांनी फिर्यादी सौरभ कुमार अवस्थी (वय 30) यांच्या तक्रारीवरून एका 32 वर्षीय महिलेच्या विरोधात 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याने भा. दं. वि. कलम 420 चा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे फक्त ऑनलाईन ओळख होणाऱ्या माणसांवर डोळे झाकून विश्वास ठेवून करण्यात येणारे आर्थिक व्यवहार टाळावेत हे प्रकर्षाने समोर येत आहे.
सौरभ हा पवईत राहतो. पवई आयआयटीजवळ रहाणार सौरभ हा एक प्रतिष्ठित कंपनीमध्ये नोकरी करतो. गेले काही वर्षे तो लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. Jeevansathi.com या लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटवर त्याने रजिस्टर केले होते. या वेबसाईटद्वारे त्याची राधिका दीक्षित या तरुणीशी ओळख झाली. शुभदा शुल्क असे आरोपी महिलेचे नाव असून तिने राधिका दीक्षित नावाने बोगस अकाउंट बनविले होते. ती बदलापूरला राहते. आपल्याला हवी होती तशी मुलगी असल्याचे सौरभला त्यावेळी वाटले आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली. या महिलेने देखील त्याला होकार दिला. त्यांच्यात ऑनलाईन आणि मोबाईलवर गेल्या काही महिन्यापासून बातचीत सुरू झाली. या महिलेने सौरभला अत्यंत विश्वासात घेतले आणि त्याच्याकडून काही न काही कारणे सांगून पैश्याची मदत मागू लागली. आपले वडील आजारी आहे. आई आजारी आहे अशा विविध कारणांनी तिने सौरभकडून कधी ऑनलाईन बँक खात्यातून तर कधी माणसं पाठवून रोख रक्कम उकळली. ही रक्कम जवळ जवळ 23 लाख रुपयांपेक्षा जास्त होती. दरम्यान सौरभने वारंवार तिला प्रत्यक्ष भेटण्यास येण्याची विनंती केली. परंतु, ही तरुणी समोर येत नव्हती. अखेर एक दिवस त्याने भेटण्याचा प्रचंड आग्रह केल्यावर या तरुणीने हिरानंदानी विभागात त्याची भेट घेतली. परंतु, जेव्हा सौरभने या महिलेला पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. Jeevansathi.com वरील प्रोफाइल असलेले छायाचित्र हे त्या महिलेचे नसल्याने सौरभची निराशा होऊन मोठा धक्का बसला. तसेच तिचे नाव देखील खोटे होते. यामुळे सौरभला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने त्या तरुणीकडे दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. परंतु, तिने पैसे देण्यास नकार दिला. अखेर या तरुणाने पवई पोलीस ठाणे गाठून या तरुणीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पवई पोलिसांनी या प्रकरणी Jeevansathi.com या वेबसाईटला ही पत्र लिहिले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून या तरुणीचा शोध सुरू केला आहे.