पुणे : इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून एका महिलेने एका तरुणाला तब्बल ३३ लाख ५० हजार ९७५ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी एका अज्ञात महिलेविरुध्द ३७ वर्षाच्या पुरुषाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची एका महिलेबरोबर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीनंतर महिलेने भारतात पैसे गुंतविणार असल्याचे त्या व्यक्तीला सांगून व्हॉटसअपवर लंडन ते दिल्ली या विमान प्रवासाच्या तिकीटाचा फोटो पाठविला. तसेच १० सप्टेंबर रोजी दिल्ली एअरपोर्ट येथे येणार असल्याची माहिती दिली. या तारखेला फिर्यादीला दिल्ली कस्टम कार्यालयातून एकाचा फोन आला. त्या व्यक्तीने तुमच्या ओळखीची महिला परदेशातून दिल्ली येथे आली असून तिने यलो पेपरची पुर्तता केली नाही. तसेच तिने सोबत महागड्या वस्तू व फॉरेन करंन्सी आणल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादीला फॉरेन करंन्सी त्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी, दिल्ली ते पुणे विमान तिकीट, फंड रिलीज आॅर्डर आदी कारणांसाठी वेळोवेळी फोन करुन बँकेच्या विविध नऊ खात्यांवर ३३ लाख ५० हजार ९७५ रुपयांची रक्कम वर्ग करण्यास सांगितले. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबंधित महिलेने संपर्क क्रमांक बंद केला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी सायबर क्राईम सेलकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. फिर्यादीच्या घरच्यांना नव्हती कल्पना एव्हीएशन कंपनीत फिर्यादी मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे. त्याने २६ दिवसांच्या कालावधीत घरातील, बँकेतील व इतर ठिकाणी गुंतवलेले पैसे आॅनलाईन पध्तीने संबंधित कस्टम अधिका-याच्या सांगण्यावरुन भरले आहेत. विशेष म्हणजे घरच्यांना एवढ्या मोठ्या आॅनलाईन व्यवहाराची कल्पना गुन्हा दाखल होईपर्यंत नव्हती.
इन्स्टाग्रामवरच्या मैत्रीतून महिलेने घातला एकाला साडे तेहतीस लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 6:28 PM
फिर्यादीची एका महिलेबरोबर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली
ठळक मुद्दे बँकेच्या विविध नऊ खात्यांवर ३३ लाख ५० हजार ९७५ रुपयांची रक्कम वर्गफसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी सायबर क्राईम सेलकडे तक्रार अर्ज दाखल घरच्यांना नव्हती एवढ्या मोठ्या आॅनलाईन व्यवहाराची कल्पना गुन्हा दाखल होईपर्यंत