दिल्ली: दिल्लीतल्या नरेला परिसरात एका महिलेसोबत लूटमार झाल्याची घटना घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. महिलाच्या हाती असलेलं एक पॅकेट पळवून नेण्याचा प्रयत्न चोरट्यानं केला. चोरट्यानं पॅकेट खेचण्याचा प्रयत्न केला. पण महिलेनं संपूर्ण ताकद एकवटून पॅकेट धरून ठेवलं आणि चोरावर प्रतिहल्ला केला. दुपारी तीनच्या सुमारास एका निर्जन रस्त्यावर हा थरार सुरू होता.
चोरट्यानं महिलेच्या हातात असलेलं पॅकेट हिसकावण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. महिलेनं चोराला लाथ मारली. त्यानंतर त्याचं डोकं एका दारावर आपटलं. चोराशी दोन हात करताना महिला जोरजोरानं ओरडत होती. आसपासच्या लोकांनी मदत करावी यासाठी तिचे प्रयत्न सुरू होते. दरवाज्यावर आपटलेल्या चोरट्यानं पुन्हा महिलेकडील पॅकेट खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेनं पकड ढिली होऊ दिली नाही.
आणखी थोडा वेळ झटापट झाल्यास आसपासचे लोक जमतील आणि आपल्याला पकडतील या भीतीनं चोरानं पळण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी चोरट्यानं एक शेवटचा प्रयत्न केला. महिला रस्त्यावर पडली होती. त्यामुळे चोरटा तिची पर्स घेऊन फरार झाला. महिलेनं बँकेतून दीड लाख रुपये काढले होते. ते तिनं पॅकेटमध्ये ठेवले होते. महिला बँकेत बाहेर पडल्यापासून तिघे जण तिचा पाठलाग करत होते. यातले दोघे दुचाकीवर होते. तर तिसरा रोख रक्कम लांबवण्यासाठी पुढे सरसावला होता.
महिलेचं वय अधिक असल्यानं फार प्रतिकार होणार नाही अशी चोरट्याची समजूत होती. मात्र महिलेनं प्रतिहल्ला केल्यानं चोरट्याचे मनसुबे उधळले. दीड लाख रुपये असलेल्या पॅकेटमधून ५० हजारांचं एक बंडल खाली पडलं. चोरट्यानं ते लांबवलं. याशिवाय तो पर्सदेखील घेऊन पसार झाला. त्यात ७ ते ८ हजार रुपये होते.