पुणे : लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडायला बंदी असल्याने इंटरनेटवरील खरेदी विक्रीच्या संकेतस्थळावरील खरेदी विक्री बंद होती. त्यामुळे याद्वारे होणारी फसवणुकही जवळपास थांबली होती. लॉकडाऊन शिथिल केल्यावर अनेक व्यवहार सुरु झाले. त्याबरोबर सायबर चोरटेही सक्रीय झाले आहेत. ओएलएक्स या खरेदी विक्रीच्या संकेतस्थळावरुन पुन्हा फसवणुकीचा व्यवहार सुरु झाला आहे.याप्रकरणी डॉ. प्रेरणा गुलेरिया (वय ३९, रा़ गंगा सॅटेलाईट, वानवडी)यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनी खरेदीविक्रीच्यासंकेतस्थळावर सोफा व खुर्ची विकण्यासाठी जाहिरात दिली होती. २८ मे रोजी सायंकाळी एका मोबाईलधारकांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सोफा,खुर्ची खरेदी करणार असल्याचे सांगितले. त्याने गुलेरिया यांना एक क्यु आरकोड पाठविला. त्यांनी तो स्कॅन केल्यावर त्यांच्या बँक खात्यातून तातडीने ५० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनीया मोबाईलधारकाला पैसे कट होत असल्याचे सांगितले. त्यानंतर यामोबाईलधारकाने पुन्हा एक कोड पाठविला. तो त्यांनी स्कॅन केल्यावर पुन्हा त्यांच्या बँक खात्यातून ४० हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचा मेसेज त्यांना आला. याप्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.