अमरावती : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आढळलेल्या महिलेच्या कुजलेल्या मृतदेहाचे धागेदोरे अकोला जिल्हाशी जुळले आहेत. पोलिसांना महिलेच्या मृतदेहाजवळ अकोला येथील रेल्वे तिकीट मिळाल्याने ती महिला अकोला जिल्ह्यातील असण्याचा अंदाज पोलिसांचा आहे. वलगाव पोलिसांना काही दिवसांपूर्वी संतोष अंबाडकर यांच्या नया अकोला शिवारातील शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाजवळ अकोला रेल्वे स्थानकाहून काढलेल्या तीन तिकीट आढळल्या. ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तीन दिवस मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवला होता. मात्र, तिची ओळख पटली नाही. तिसºया दिवशी मृतदेहाच्या शवविच्छेदनात त्या महिलेच्या अंगावर धारदार शस्त्रांच्या खुणा आढळून आल्या. वैद्यकीय अहवालावरून वलगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. महिलेची हत्या करून तिचा मृतदेह फेकण्याचा आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्या दिशेने पोलीस यंत्रणा तपासकामी लागली आहे. महिलेजवळ आढळलेल्या तिकिटांच्या अनुषंगाने पोलिसांनी अकोला रेल्वेस्थानकावर चौकशी केली. तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. विशेष म्हणजे, पोलिसांना दोन व्यक्तींवर संशय असून, त्यांच्या चौकशीनंतर या हत्याकांडाचे चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आता या हत्याप्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. मृत महिलेजवळ अकोला येथील तिकीट आढळून आल्या होत्या. त्या अनुषंगाने चौकशी सुरू असून, अद्याप महिलेची ओळख पटली नाही. परिणामी गुन्ह्याचा उलगडा झालेला नाही. - मोहन कदम, पोलीस निरीक्षक, वलगाव ठाणे
महिलेच्या कुजलेला मृतदेहाचे धागेदोरे अकोल्याशी जुळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 9:07 PM