नालासोपारा : पोलीस खात्यात काम करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या खुर्चीत बसणं हे प्रत्येक पोलिसाचं स्वप्न असतं. साहेबां सारखा रूबाब, जरब याचं आकर्षण असतंच आणि त्याशिवाय त्यांच्याप्रमाणे धडाडीचे निर्णय घेण्याची इच्छाही असते. महिलापोलिसांचे हे स्वप्न बुधवारी पुर्ण झाले. निमित्त होते महिला दिनाचे. महिलांच्या या खास दिवशी वसईतील सातही पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकांना एक दिवसाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनविण्यात आले तर महिला हवालदारांना ठाणे अमंदलार बनविण्यात आले. या महिलाराजमुळे शुक्र वारी वसई तालुक्यातील महिला पोलिसांचा दिवस खास ठरला होता.शुक्र वारी जागतिक महिला दिनी विविध कार्यक्र मांनी साजरा झाला. पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग आणि वसई विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी महिला पोलिसांना अनोख्या पध्दतीने मानवंदना देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महिला पोलीस उपनिरिक्षकांना एक दिवसांचे पोलीस ठाण्याच्या प्रमुख पद देण्याचे ठरवले. तर पोलीस नाईक आणि पोलीस हवालदार दर्जाच्या महिला कर्मचाऱ्यांना पोलीस ठाणे अमंलदार बनविण्याचे ठरवले. या आगळ्यावेगळ्या कल्पनेला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला.सहायक पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांना तुळींज, पोलीस उपनिरीक्षक सरला काळे यांना वालीव, पोलीस उपनिरीक्षक अनिता पवार यांना माणिकपूर पोलीस उपनिरीक्षक परवीन तडवी आणि लक्ष्मी बोरकर यांना विरार येथे एक दिवसांचे पोलीस निरीक्षक बनविण्यात आले तर महिला पोलीस नाईक दीपाली कदम यांना नालासोपारा, पोलीस नाईक जयंती राजगुरू यांना एक दिवसाचे ठाणे अंमलदार बनविण्यात आले. यावेळी सर्व महिला पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांचा सत्कारही करण्यात आला.मी पोलीस खात्यात आले तेव्हा पोलीस ठाण्याचे प्रमुखपद हे स्वप्न होते. ते भविष्यात कधी होईल ते माहित नाही पण आज पुर्ण झाल्याचा छान अनुभव आला. रोज मी साहेबांचे ऐकायचे आज सर्वजण माझे ऐकत होते हे पाहून अगदी वेगळंच वाटत होतं असे तुळींज पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. एरवीपण मी काम करतेच परंतु आज महिलांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला असेही त्या म्हणाल्या. महिला दिनी पोलिसांचे सत्कार करतो पण वेगळं काहीतरी करण्याचा हा प्रयत्न होता असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले. महिला पोलिसांमध्ये प्रचंड क्षमता आहे. हे त्यांनी एका दिवसात दाखवून दिले असे सांगत त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनलेल्या महिला पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे. तर वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यात महिला दिनाच्या अनुशंगाने सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
Women's Day 2019 - सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुख बनल्या महिला पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 11:16 PM