पुणे - आंतरजातीय विवाह केलेल्या विवाहितेचा दिर व सासरच्या मंडळीनी छळ करून पतीला भेटण्यास अटकाव केल्याचा प्रकार विश्रांतवाडीत घडला असून गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी पीडित विवाहितेचीच मध्यरात्री उलटतपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. आठ दिवसांपासून पतीला भेटू न देता तिला सासरी नेऊन देखील तिचा अप्रत्यक्ष मानसिक छळ दिर व इतर नातेवाईक करत आहेत.याप्रकरणी गेली चार दिवस पोलिसांकडे न्याय मागणाऱ्या या अबलेला मदत मिळालेली नाही. परंतु, सासरच्या मंडळीवर मेहेरबान पोलिसांनी "भरोसा" न दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने "ती" मदतीच्या प्रतीक्षेत आहे. प्रतिकनगर येथील एका युवतीची शांतीनगर येथील एका टेलर युवकासोबत 2013 मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र त्याच्या कुटुंबियांच्या दुसर्या जातीतील मुलीसोबत विवाहाला विरोध होता. खर्या प्रेमासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह करण्याचे ठरवले. त्यासाठी "तिने" मनावर दगड ठेवून "धर्मांतर" करून 2016 मध्ये त्याच्या सोबत "निकाह" केला. सुरूवातीला काही दिवस हि बाब त्यांनी कुटुंबियांच्या पासून लवपून ठेवली. त्याने तिला वेगळे घर घेऊन त्यांनी संसार सुरू केला. मात्र तीला सासरच्या मंडळीचा विरोध अजूनही कायमच होता. लग्नाचा कायदेशीर पुरावा नसल्यामुळे त्याने 8 जानेवारी 2019 मध्ये पुन्हा कोंढवा येथे मौलवींकडून निकाहना पढून विवाह करण्यात आला.तसेच तिचे धर्मांतर केल्याचे ?फिडेव्हिट वकिलांकडून बनविण्यात आले. दरम्यानच्या काळात घरच्या मंडळीच्या दबावाखाली त्याने यापूर्वी मूळ गावी जाऊन दुसरे लग्न केले. तिने त्याला याबाबत विचारणा केली असता वडिलांच्या आजारपणाची सबब पुढे केली. नंतर काही वेळाभेटी गाठी होत होत्या मात्र 5 जुलै पासून तिचा पतीशी संपर्क होत नव्हता. हि बाब तिने तिच्या काही नातेवाईकांना सांगून मदत मागितली. त्यांनी शांतीनगर येथे राहणारे तिचे दिर व इतर नातेवाईकांशी चर्चा करून तिला तिच्या सासरी त्यांच्या सोबत पाठवण्यात आले.मात्र तिच्या दिराने रात्री उशिरा आमच्या घरात अनोळखी महिला आल्याचा खोटा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला केला.विश्रांतवाडी पोलिसांनी खातरजमा न करता त्या पिडीत विवाहितेला चौकशीसाठी मध्यरात्री पोलिस स्टेशन येथे आणले. नंतर सारवासारव करीत प्रकार मिटवून घेतला. तिच्या पतीला पोलिसांसमोर घेऊन येतो अशा थापा तो गेली चार दिवस मारत दिशाभूल करीत आहे. सदरच्या पिडीत विवाहितेने शनिवारी ग्रीनतारा फांऊडेशनच्या महिला समुपदेशकासह पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांची भेट घेतली. याप्रकरणी त्वरित योग्य ती कायदेशीर कारवाई व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र अद्याप देखील सदरची महिला ही सासरच्या मंडळीच्या दहशतीखाली असून न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
आंतरजातीय विवाह केलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 2:03 PM
गेली चार दिवस पोलिसांकडे न्याय मागणाऱ्या या अबलेला मदत मिळालेली नाही. परंतु,सासरच्या मंडळीवर मेहेरबान पोलिसांनी "भरोसा" न दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने "ती" मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
ठळक मुद्दे : पोलिसांकडून मात्र '' भरोसा '' नाही