मुंबई : सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले शुद्ध सोने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना काळबादेवी येथे घडली आहे. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी कारागीर जगन्नाथ मंडलविरुद्ध गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. वडाळा येथील रहिवासी असलेले भावेश ओझा यांचे काळबादेवी येथे सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. याच परिसरात कारागीर असलेला मंडल दागिने बनविण्याचे काम करतो. ओझा यांनी जानेवारीत त्याच्याकडे सोन्याचे दागिने बनविण्यासाठी ४५ लाखांचे शुद्ध सोन्याचे बार दिले होते. मात्र दिलेल्या वेळेत दागिने बनवून न मिळाल्याने ओझा यांनी मंडलसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क झाला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी त्याच्या कारखान्यात धाव घेतली. मात्र ताे गायब हाेता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ओझा यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी मंडलविरुद्ध गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.
सराफाचे ४५ लाखांचे सोने घेऊन कारागीर झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 3:25 AM